PM Modi touched Feet Video Viral: दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. बुधवारी घोंडा येथे मोदींची जाहीर सभा होत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी सर्व उमेवारांना मंचावर बोलावले होते. उमेदवार एक एक करून पंतप्रधान मोदींना मंचावर येऊन भेटत होते, तसेच त्यांचे आशीर्वाद घेत अभिवादन करत होते. मात्र यावेळी एक अजब प्रकार पाहायला मिळाला. जिथे सर्व उमेदवार मोदींचे हस्तांदोलन करत होते, तिथे एका तरुण उमेदवाराला पंतप्रधान मोदींनी वाकून तीन वेळा नमस्कार घातला. या घटनेमुळे मंचावरील उपस्थित नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा तरुण उमेदवार कोण? याची चर्चा सध्या सुरू आहे. पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रवींद्र सिंह नेगी (वय ४५) यांना वाकून नमस्कार केल्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. नेगी यांच्यानंतर विश्वास नगरचे उमेदवार ओम प्रकाश शर्मा यांनीही मोदी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना मध्येच अडविण्यात आले. याआधीही जाहीर कार्यक्रमात मोदींनी त्यांच्या पाया पडणाऱ्या लोकांना थांबविले होते. पंतप्रधान मोदी कुणालाही त्यांच्या पाया पडू देत नाहीत, अशी कृती करणाऱ्यांना त्यांनी अनेकदा अडवले आहे.
कोण आहेत रवींद्र सिंह नेगी?
रवींद्र सिंह नेगी हे सध्या विनोद नगरमधून नगरसेवक आहेत. हा विभाग पटपडगंज विधानसभा मतदारसंघात मोडतो. रवींद्र सिंह नेगी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी काही व्हिडीओ शेअर केले होते, ज्यामुळे वाद उद्भवला. पश्चिम विनोद नगर येथे असलेल्या एका डेअरीच्या समोर उभे राहून नेगी यांनी डेअरी चालकाला धमकावले होते. अल्तमश तोमर नामक मालकाच्या डेअरीचे नाव फक्त तोमर ठेवण्यात आले होते. नेगींचे म्हणणे होते की, तुमचे पहिले नाव जे काही असेल, तेही दुकानावर दिसले पाहीजे. फक्त तोमर लिहून चालणार नाही. जर पूर्ण नाव दुकानावर लिहिले नाही तर दुकान बंद करू, अशीही धमकी त्यांनी दिली होती.
याशिवाय नेगी यांनी हिंदू फेरीवाल्यांनाही आवाहन करत असताना भगवा झेंडा गाडीवर लावण्यास सांगितले होते. तसेच हिंदू सणांआधी त्यांनी खाटिकाच्या दुकानाला भेट देऊन सणांच्या काळात दुकान बंद ठेवण्यास सांगितले होते.
खालील व्हिडीओमध्ये १.२० ते १.२६ सेकंदाला पंतप्रधान मोदींनी केलेली कृती चर्चेचा विषय ठरत आहे.
नेगी यांनी २०२० मध्ये राजकीय जीवनात पदार्पण केले होते. पटपडगंज विधानसभेतून त्यांनी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कडवी झुंज दिली. केवळ दोन टक्क्यांच्या मतांनी त्यांचा पराभव झाला. तर २०२२ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी ‘आप’च्या उमेदवाराचा पराभव केला.