Delhi Election Results Memes: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा आज (८ फेब्रुवारी) निकाल लागला. भाजपाने ४८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. तर सत्ताधारी ‘आप’ पक्षाला केवळ २२ जागा मिळू शकल्या आहेत. काँग्रेसच्या पदरी पुन्हा एकदा निराशा लागली असून काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. काँग्रेस आणि ‘आप’च्या पराभवानंतर आता सोशल मीडियावर त्यांची थट्टा उडविणारे आणि निकालांवर उपरोधिक भाष्य करणारे मीम्स व्हायरल होत आहेत. ‘आप’साठी हा निकाल धक्कादायक असला तरी भाजपाला मात्र २७ वर्षांनंतर दिल्लीतील सत्ता काबीज करण्यात यश मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानिमित्ताने व्हायरल होणाऱ्या काही मीम्सवर नजर टाकू. एक्स या साईटवर मीम्सचा पूर आला आहे.

एका युजरने अरविंद केजरीवाल यांची तुलना आयपीएलमधील आरसीबी संघाच्या विराट कोहलीशी केली आहे. एकही चषक जिंकता न आल्यामुळे विराट कोहलीला अश्रू अनावर झाले होते, हा फोटो पोस्ट करत “अरविंद केजरीवाल यांची सद्यस्थिती” असे कॅप्शन देण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या पर्वेश वर्मा यांनी पराभव केला.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सकाळीच काँग्रेस आणि ‘आप’वर टीका करणारे एक मीम शेअर केले होते. इंडिया आघाडी दिल्ली निवडणुकांमध्ये विखुरली. आप आणि काँग्रेसने वेगळे होऊन निवडणूक लढविल्यामुळे भाजपाचा विजय सोपा झाला. या पार्श्वभूमीवर “आपापसातच आणखी लढा”, असा खोचक टोला ओमर अब्दुल्ला यांनी लगावला.

सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचही ट्रोलिंग होत आहे. एका एक्स युजरने पेट्रोल पंपावर राहुल गांधी उभे असलेले दाखवले असून ते शून्य बघा, असे म्हणत आहेत.

‘आप’च्या माजी नेत्या, राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी ‘आप’ विरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यांनी निवडणूक लढविली नसली तरी ‘आप’ला नुकसान पोहोचवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्यांच्याही नावे काही मीम व्हायरल होत आहेत.

‘आप’च्या पराभवानंतर स्वाती मालिवाल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना हा ‘आप’च्या अहंकाराचा पराभव झाला असल्याचे म्हटले.

विधानसभा निवडणुकीआधी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकिय निवासस्थानावरून बराच गदारोळ माजला होता. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या सुशोभिकरणावर कोट्यवधींचा खर्च केल्याचा आरोप केला गेला. तसेच त्याला शीशमहल अशी उपाधी दिली गेली. यावरही अनेकांनी मीम तयार केले आहे.

दिल्लीमधील विधानसभेच्या ८० जागांसाठी दि. ५ फेब्रुवारी रोजी एकाट टप्प्यात मतदान पार पडले होते. दि. ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन, माजी मंत्री सौरभ भारद्वाज या मोठ्या नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले.