राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी या निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय होईल अशी आशा व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे भाजपा ५५ जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा दिल्लीत आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये तिरंगी लढत झाली. मात्र, आप आणि भाजपा यांच्यामध्ये प्रमुख आणि प्रतिष्ठेची लढत पहायला मिळाली. दरम्यान, आपल्या सरकारनं गेल्या पाच वर्षात केलेली कामं आणि विकासाच्या मुद्द्यावरच यात आपनं प्रचार केला. तर भाजपानं देशभक्तीचं कार्ड वापरुन घेतलं. दरम्यान, मतदानानंतर आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये आपचं पारडं जड दाखवलं जात आहे. मात्र, हे सर्व पोल चुकीचे ठरतील आणि भाजपाचा मोठा विजय होईल असा विश्वास मनोज तिवारी यांनी व्यक्त केला आहे.

तिवारी म्हणाले, मी या निकालाबाबत आजिबात चिंताग्रस्त नाही. मला विश्वास आहे की आजचा दिवस भाजपासाठी चांगला असेल. आज आम्ही दिल्लीत सत्तेत येणार आहोत. भाजपानं ५५ जागा जिंकल्यास आश्चर्य वाटायला नको, अशा शब्दांत तिवारी यांनी भाजपा बहुमताने सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

“निकाल काहीही येवो ईव्हीएमला कोणी दोष देऊ नये”

“आता तर तुम्हाला जितकं बोलायचं होतं बोलून झालं आहे. त्यानंतर निकाल समोर येणार आहे. हे निकाल तर स्पष्ट होतीलच मात्र, याचे निकाल आश्चर्यकारक लागले तर कोणीही ईव्हीएमला दोष देता कामा नये. दिल्लीकरांचा आशीर्वाद हा भाजपालाच मिळेल,” असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

“आप जुन्या कामांवरच आपला स्टँप लावत आहे”

शहराची, नागरिकांची सुरक्षा तर सर्वांनाच करावी लागते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची तर ती जबाबदारीच असते. मात्र, आप जुन्या कामांवर आपला स्टँप लावत असल्याचा आरोप यावेळी मनोज तिवारी यांनी केला. आमचा अनुमान ठाम असून अनेकदा एक्झिट पोलही चुकीचे ठरले आहेत, असे तिवारी यावेळी म्हणाले.