दिल्लीकरांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा व काँग्रेसला सपशेल नाकारत  आम आदमी पार्टीच्या बाजूने कौल दिला. विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला. आता अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.मात्र, यंदा केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मुहूर्त दोन दिवस पुढे गेला आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी शपथ घेणारे केजरीवाल यावेळी रविवार, १६ फेब्रवारी रोजी  रामलीला मैदानात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.

व्हॅलेंटाइन डे आणि केजरीवाल –
२०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्लीत आम आदमी पार्टीचं सरकार सत्तेत आलं होतं. तेव्हा भाजपाला ३१, आम आदमी पार्टीला २८ व काँग्रेसला ८ जागांवर विजय मिळाला होता. राज्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना केजरीवाल यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा २८ डिसेंबर रोजी पहिल्यांदा त्यांनी मुख्यंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, काही दिवसानंतर काँग्रेस व ‘आप’मध्ये मतभेद झाल्याने अवघ्या ४९ दिवसांत ते सरकार कोलमडलं होतं. यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे त्यांनी राजीनामा दिला तो दिवस देखील १४ फेब्रुवारीच होता.

यानंतर २०१५ मधील निवडणुकांची घोषणा झाली. तेव्हा आम आदमीचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी जाहीर करून टाकले होते की, रामलीला मैदानात १४ फेब्रुवारी रोजी केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील व तसेच घडले. आम आमदी पार्टीने ७० पैकी ६७ जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता स्थापन केली. तर भाजपाला अवघ्या ३ जागा जिंकता आल्या. यानंतर केजरीवाल यांनी १४ फेब्रुवारी २०१५ रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सत्तास्थापन केल्याच्या तीन वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये केजरीवाल यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेषबाब म्हणजे हा कार्यक्रम देखील १४ फेब्रवारी रोजी आयोजित करण्यात आला होता.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ५५ जागा मिळतील असे भाकीत केले होते. मात्र, भाजपला गेल्या वेळेपेक्षा फक्त पाच जागा जास्त मिळाल्या आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला असून, पक्षाला पाच टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला निवडणुकीत खाते उघडण्यात अपयश आले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. पक्षाच्या फक्त तीनच उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली आहे.

Story img Loader