आमच्या तीन जागांपेक्षा एकजरी जास्त आली तरी तो आमचा विजय आहे. अद्यापही सर्व निकाल हाती यायाचे आहेत. आप -५७ व भाजपा -१३ हे केवळ कलच दाखवले जात आहेत. अद्यापही माझ्यामते एक चतुर्थांश मतांची मोजणी व्हायची आहे. मध्यंतरी २० ते २२ जागांपर्यंत आम्ही पोहचलो होतो. आमची अजूनही ही अपेक्षा आहे की आम्ही २५ ते ३० दरम्यान पोहचू. शेवटी निवडणुका या अशा असतात की ज्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपली ताकद लावायची असते, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, दिल्लीच स्पष्ट विश्लेषण असं आहे की, भाजपाला देशभर एकटं पाडण्यासाठी वाटेल ती तडजोड करून सर्व एकत्र येत आहेत. महाराष्ट्र हे त्याचं मोठं उदाहरण आहे. ज्या दिल्लीत १५ वर्षे काँग्रेसनं राज्य केलं, त्याच काँग्रेसला चार टक्के मतं पडत आहेत. ही जी काँग्रेसची मतं दुसरीकडे वळाली त्यामध्ये आमचा पराभव म्हणता येणार नाही.
देशभरातील सर्वच राजकीय पक्षांना आमचं आव्हान आहे की, त्यांनी आमच्याविरोधात स्वतंत्र लढावं. सर्व एकत्र येऊन ताकद उभी करणं व किमान सामायिक कार्यक्रमावर काम करणं व त्या व्यतिरिक्त असलेले विषय सोडून देणं, यामध्ये काही मजा नसल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
काँग्रेसने शेवटच्या चार दिवसात आपली मत ‘आप’कडे वळवली –
केजरीवालांना जे काही यश मिळालं हे विकासाच्या मुद्यावर नाहीतर, शेवटच्या चार दिवसांत काँग्रेसने आपली जी काही मतं आम आदमी पार्टीकडे वळवली त्याचा हा विजय आहे, त्याचा हा पराजय आहे. दिल्लीत आम्ही नेहमीच ३३ टक्के मतांवर असायचो, त्यामध्ये आमची वाढच झालेली आहे. मात्र, एकेकाळी राज्य करणारी काँग्रेस चार टक्क्यांवर आली आहे.