अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार असल्याचे दिसत आहे. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला पाठिंबा दर्शवला आहे. तर, मागीलवर्षीप्रमाणेही यंदाही काँग्रेसला दिल्लीकरांनी साफ नाकारल्याचे पाहून दिल्ली काँग्रेस अध्यक्ष यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. शिवाय, ते पदाचा राजीनामा देखील देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी मी माझ्यावर घेत आहे. ही माझी नैतिक जबाबदारी आहे. दिल्लीच्या जनतेने जो काही कौल दिला आहे, त्यासमोर मी नतमस्तक होतो. आमच्या मतांच्या टक्केवारीत घट होण्याचे कारण म्हणजे भाजपा आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांनी मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण केले. एवढे परिश्रम घेऊनही पराभव कसा झाला? नेमकी काय उणीव राहिली? याबाबत विचार करावा लागेल.” असं दिल्ली काँग्रेस अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी म्हटलं आहे.

मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष जवळपास 55 आणि भाजपा 15 जागांवर आघाडीवर आहे. तर, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही काँग्रेसला भोपळाही फोडता येत नसल्याचे चित्र आहे. यंदा काँग्रेसच्या पारड्यात सुमारे ४.५ टक्केच मतं पडली असल्याने गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांचे पाच टक्क्यांचे नुकसान झाले आहे.