दिल्ली विधानसभा निवडणुकी आम आदमी पार्टीच्या ‘झाडू’समोर भाजपासह काँग्रेसही साफ झालेली असताना दिल्लीत मतांसाठी चाचपडत असलेली शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या चाचणी परीक्षेत ‘नापास’ झाला आहे.

फतेह सिंह हे आम आदमी पक्षाचे आमदार होते. पण त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना गोकलपूर येथून उमेदवारी देण्यात आली होती. गेल्या निवडणुकीत ‘आप’ची टोपी घालून विजय मिळवलेल्या फतेह सिंह यांना राष्ट्रवादीच्या घडाळ्यानं साथ दिली नाही. या निवडणुकीत त्यांनी दणक्यात मार खाल्ल्याचे पाहायला मिळते. सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यांना केवळ ४२० मते मिळाली होती. या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या सुरेंद्र कुमार यांना ८८ हजारांपेक्षा अधिक मते होती. भाजपाच्या रणजीत सिंग यांना ६८ हजारांवर मते मिळाली होती.

राष्ट्रवादीने राणा सुजीत सिंहला छत्तरपूर मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. मात्र त्यांनाही सपाटून मार खावा लागला. त्यांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार १७१ मते मिळाली.

मयूर बन यांना राष्ट्रवादीने मुस्तफाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांना केवळ २८८ मते मिळाली आहेत. त्यांच्यापेक्षा ‘नोटा’ला अधिक मते मिळाली. या मतदारसंघातील ४६२ लोकांना नोटाचा पर्याय निवडला.

बाबरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर जाहीद अली रिंगणात उतरले होते. आप-भाजपाच्या लढाईत त्यांचाही निभाव लागला नाही. त्यांनी मतांचे केवळ शतकच ठोकले. त्यापुढे त्यांना जाता आलं नाही.

दिल्लीत आपलं संघटन उभं करण्यासाठी चार उमेदवार दिले असल्याचे पवार यांनी या निकालानंतर सांगितलं. पण, हे चारही उमेदवार मतदारांवर फारसा करिष्मा करू शकले नाहीत.

Story img Loader