केजरीवाल यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. आता त्यांनी जी आश्वासनं दिली त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली आहे.
यावेळी त्यांनी २०२४ च्या निवडणुकीत दिल्लीची संपूर्ण जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी असेल असा मला विश्वास आहे, असेही बोलून दाखवले. तसेच, काँग्रेसच्या अपयशाबद्दलही त्यांनी टिप्पणी केली. राहुल गांधी उलटसुलट बोलत असल्याने काँग्रेसचं खात उघडणार नाही. ते जर असंच वागत राहिले तर लोकसभेत देखील काँग्रेसच खातं उघडणं अवघड असल्याच त्यांनी बोलून दाखवलं.
आठवले म्हणाले, भाजपाच्या अगोदर तीन जागा होत्या, आता संख्या वाढली आहे. आपल्या ३० ते ३५ जागा येतील, अशी भाजपाला अपेक्षा होती. परंतु, मला वाटतं की शाहीनबाग आंदोलन व सीएए विरोधातील आंदोलनाद्वारे मुस्लीम समाजातील मोठा रोष पाहायला मिळाला. खरंतर सुधारित नागरिकत्व कायदा त्यांच्या विरोधात नाही. मात्र तरीदेखील त्याचा विरोध केला जात आहे. याचा थोडाफार परिणाम पडल्याचे दिसत आहे. मुस्लीम भागांमध्ये भाजपाला फार यश मिळाले नाही. शेवटी जनादेशाचा कौल आम्ही मान्य करतो. परंतु, २०२४ मध्ये ज्या निवडणुका होतील, त्यामध्ये संपूर्ण दिल्लीची जनता नरेंद्र मोदींच्याबरोबर असेल याचा विश्वास आहे.
ते जर आमच्या पंतप्रधानांना डंडा मारणार तर आम्ही त्यांना अंडा मारू –
काँग्रेसच खातं उघडणार नाही, कारण जोपर्यंत राहुल गांधी आहेत, ते उलटसुलट बोलत राहतात. ते असंच उलटसुलट बोलत राहिले तर काँग्रेसचं खातं उघडणार नाही. राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीत यश न मिळाल्यानेच त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसला उभारी घेण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. जर राहुल गांधींनी नियोजनबद्ध कामं केली नाही व पंतप्रधान मोदींच्या विरोधात उलटसुलट वक्तव्य करत राहिले तर असंच होणार. ते जर आमच्या पंतप्रधानांना डंडा मारणार असतील तर आम्ही त्यांना अंडा मारू. राहुल गांधींनी थोड सांभाळून बोललं पाहिजे. ते जर अशाचप्रकारे वागत राहिले, तर मला वाटतं लोकसभेत देखील त्यांच खातं उघडण अवघड आहे. असं रामदास आठवले यांनी यावेळी बोलून दाखवलं.