दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मी अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे, आता यावर पक्षाच्या हायकमांडकडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी दिली आहे.

“मी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकरत आहे. माझ्याकडे कमी वेळ होता. मात्र तरी देखील मी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मी दिल्लीत कधीच अशाप्रकारचे राजकारण पाहिले नाही, जिथं मतदार आम आदमी पार्टीकडून करण्यात आलेल्या जाहीरताबाजीने प्रभावित झाले व त्यांना मतदान केलं.” असं सुभाष चोप्रा यांनी सांगितलं आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुभाष चोप्रा यांना दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपण्यात आली होती. ७२ वर्षीय सुभाष चोप्रांना या अगोदर १९९८ व २००३ पर्यंत देखील दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभळलेली आहे. शिवाय, १९९८ ते २०१३ पर्यंत ते सलग तीन वेळा कालकाजी विधानसभा मतदार संघातून विजयी देखील झालेले आहेत.

आणखी वाचा – आम आदमी पार्टीचे आमदार नरेश यादव यांच्यावर जीवघेणा हल्ला

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला.  तर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी ५५ जागा मिळतील असे भाकीत केले होते. मात्र, भाजपला गेल्या वेळेपेक्षा फक्त पाच जागा जास्त मिळाल्या आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला असून, पक्षाला पाच टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला निवडणुकीत खाते उघडण्यात अपयश आले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. पक्षाच्या फक्त तीनच उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली.

Story img Loader