दिल्ली विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल अद्यापपर्यंत जरी हाती आलेले नसले तरी, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचेच सरकार दिल्लीत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत सध्या आम आदमी पार्टी ६३ जागांवर आघाडीवर आहे, तर केंद्रात सत्तेत असलेला भाजपा अवघ्या ७ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकेड एकेकाळी याच दिल्लीत १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसची अवस्था मात्र दयनीय आहे. मागील वेळेप्रमाणे यंदा देखील काँग्रेसला अद्यापपर्यंत आपलं खातं देखील उघडता आलेलं नाही. अवघी चार टक्के मतं काँग्रेसच्या वाट्याला आल्याचे दिसत आहे.

काँग्रेस दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात १९९८ ते २०१३ पर्यंत सत्तेत होती. मात्र, २०१३ पासून काँग्रेसची घसरण सुरू झाली. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील गत विधानसभा निवडणुकांचा इतिहास आपण जाणून घेऊयात.

१९९८ मधील निवडणुकांद्वारे दिल्लीत काँग्रेसला उभारी मिळाली होती. या निवडणुकीत महागाई हा प्रमुख मुद्दा होता. त्यावेळी वाढलेले कांद्याचे प्रचंड दर हे देखील भाजपाचे सरकार पडण्यास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. या निवडणुकीतूनच शीला दीक्षित यांच्या नेतृत्वास उभारी मिळाली. त्या पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. काँग्रेसला तेव्हा ७० पैकी ५२ जागांवर विजय मिळाला होता. जवळपास ४८ टक्के मतं काँग्रेसला मिळाली होती. तर, सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वातील भाजपाचा तेव्हा पराभव झाला होता. भाजपाच्या वाट्याला १५ जागा आल्या होत्या, तर ३४ टक्के मतं मिळाली होती.

२००३ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा यश आलं. यावेळी काँग्रेसने ४७ जागांवर विजय मिळवला व पुन्हा एकदा शीला दीक्षित यांच्याच नेतृत्वात काँग्रेस सत्तेत आली. यावेळी काँग्रेसला ४८.१३ टक्के मतं मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाला २० जागांवर विजय मिळवता आला होता. भाजपाच्या वाट्याला ३५ टक्के मतं आली होती.

२००८ मधील विधानसभा निवडणुकीत देखील शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात काँग्रेस सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यात यशस्वी झाली. यावेळी काँग्रेसला ४३ जागा मिळाल्या व ४० टक्के मतं काँग्रेसच्या वाट्याला आली होती.

आम आदमी पार्टी आली सत्तेत –
२०१३ मध्ये दिल्लीतील सत्ता बदलली कॉमनवेल्थ घोटाळाचे प्रकरण चांगलेच गाजले व त्यानंतर अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर आम आदमी पार्टीचा उदय झाला. विधानसभा निवडणुकाचा निकाल त्रिशंकु लागला. भाजपाला ३१, आम आदमी पार्टीला २८ तर काँग्रेसला अवघ्या ८ जागांवर विजय मिळवता आला. त्यावेळी भाजपाला ३३ टक्के, आम आदमी पार्टीला जवळपास २९ टक्के तर काँग्रेसच्या वाट्याला २४ टक्के मतं आली. यानंतर आम आदमी पार्टीने काँग्रेसला सोबत घेत दिल्लीत सरकार स्थापन केलं, मात्र हे सरकार अवघा दीड महिन्याचं ठरलं कारण, दिल्लीत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आलं.

२०१५ मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका पार पडल्या ज्यामध्ये काँग्रेसचे सर्वात खराब प्रदर्शन झालं. आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवत दमदार उभारी घेतल्याने सर्व विरोधीपक्षाचे गड ढासळले. भाजपाच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या तर काँग्रेसला या निवडणुकीत खातं देखील उघडता आलं नाही. केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्लीत आम आदमी पार्टीची एकहाती सत्ता आली. शिवाय, आम आदमी पार्टीच्या मतांच्या टक्केवारीतही भरघोस वाढ झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. दुसरीकडे काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत घसरण होऊन ती २७ टक्क्यांवरून अवघ्या १० टक्क्यांवर आली.

आता २०२० मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीतही दिल्लीच्या जनतेने केजरीवाल यांना स्पष्ट बहुमत दिले आहे. तर, मागीलवेळी प्रमाणे यंदा देखील काँग्रेसला अद्यापपर्यंत आपलं खातं उघडता आलेलं नाही. भाजपा अवघ्या सात जागांवर आघाडीवर आहे. अशाप्रकारे देशातील सर्वाज जुना पक्ष असलेला व दिल्लीत सलग १५ वर्षे सत्ता गाजवणारा काँग्रेसपक्ष देशाच्या राजधीनीमधूनच हद्दपार झाल्याचे दिसत आहे.