पीटीआय, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला पाच दिवस राहिले असतानाच सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी राजीनामे दिले. पक्षाच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला असून प्रामाणिक विचारसरणीपासून पक्ष दूर जात असल्याचे कारण देत या आमदारांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले.
त्रिलोकपुरी मतदारसंघाचे आमदार रोहित कुमार मेहरौलिया यांनी दलित व वाल्मीकी समाजाच्या प्रगतीसाठी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे कारण देत पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजकीय फायद्यासाठी पक्षाने मागासवर्गीयांचे शोषण केले. कंत्राटी रोजगार संपविण्यास आणि तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यास सरकारला अपयश आले, असा आरोप मेहरौलिया यांनी केला. जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षाने भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूलभूत तत्त्वांचा त्याग केल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार पवन कुमार शर्मा यांनी आरोप केला की, ज्या प्रामाणिक विचारसरणीवर आम आदमी पक्षाची स्थापना झाली, त्या विचारसरणीपासून पक्ष भरकटला आहे. पक्षाची दुर्दशा पाहून मला खूप वाईट वाटत आहे. त्यामुळे राजीनामा देत आहे.
पक्षाने आरोप फेटाळले
या आमदारांनी केलेले आरोप आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या रीना गुप्ता यांनी फेटाळले. या आमदारांनी जनसेवेकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून पक्षावर निरर्थक आरोप केले आहे. राजीनाम देत दुसऱ्या पक्षात जाण्याचा त्यांचा निर्णय संधीसाधूपणा आहे, असे गुप्ता म्हणाल्या.