दिल्ली की बेटी ‘किरण’! दिल्लीच्या पंजाबीबहुल भागात ही घोषणा घुमतेय. किरण बेदी पोलीस अधिकारी असताना त्यांनी केलेल्या कामगिरीचे किस्से ऐकवले जात आहेत. किरण बेदी म्हटल्या की शिस्त असणारच. त्या मुख्यमंत्री झाल्या तर सर्वाधिक त्रास परप्रांतीयांना होईल, असा प्रचार बेदींच्या विरोधात सुरू केलाय. बेदी पंजाबी वळणाच्या; त्यांचा स्वभाव आक्रमक. त्यांना भेटायचे म्हटले की वेळ घ्यावी लागणार. केजरीवाल कसे कुठेही उपलब्ध होतील, अशी इतर प्रांतातून दिल्लीत स्थाईक झालेल्यांची भावना आहे.
दिल्लीच्या कडकाडूमा भागात मोदींची सभा होती. या सभेला या भागातील मतदारांपेक्षा इतरांचीच जास्त गर्दी झाली होती. स्थलांतरित झालेल्यांचा सधन भाग म्हणून हा जमनापार (कडकाडूमा) ओळखला जातो. स्वाभाविकपणे बिहारी, उत्तर भारतीयांचा भरणा जास्त. त्यांचा बेदींवर राग आहे, कारण बेदी मुख्यमंत्री झाल्यास आम आदमीचे म्हणणे ऐकले जाणार नाही, असा प्रचार केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यानी सुरू केला आहे. बिहार, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरित लोक, साधारण मोलमजुरी करणारे, रिक्शा, ऑटो चालक, पन्नासेक मजूर पुरवणारे छोटे कंत्राटदार यांचे धाबे किरण बेदींच्या येण्याने दणाणले आहेत. या छोटय़ा कंत्राटदारांनी मजुरांचे निवडणूक ओळखपत्र बनवून घेतले. त्यांना सुविधा पुरवल्या. त्यामुळे कंत्राटदार सांगेल त्या उमेदवारालाच हे मजूर मतदान करतात. या मजुरांशी भाजपने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मजुरांना वाटते की, भाजप सत्तेत आल्यास आपल्या सुविधा काढून घेतल्या जातील.  स्थलांतरित मजुरांप्रमाणेच ऑटो चालकांनाही बेदींची धास्ती आहे. त्यांना वाटते कधी परवाना, वाहनाच्या कागदपत्रांवरून वारंवार पोलीस अडवतील. २०१४ च्या २६ जानेवारीची आठवण काढून आप भाजपविरोधात प्रचार करतोय. गतवर्षी २६ जानेवारीला केजरीवाल मुख्यमंत्री होते. ऑटोवाले सुसाट होते. त्यांना कुणी रोखणारे नाही. यंदा २३ ते २८ जानेवारीदरम्यान इतर भागातून मध्य दिल्लीत ऑटोवाले यायलाच तयार नव्हते; कारण काही ना काही कारण काढून पोलीस चलन वसूल करत होते. त्यामुळे ऑटोवालेदेखील आम आदमी पक्षालाच पाठिंबा देत आहेत. बेदी सत्तेत आल्यास पोलिसांचा जाच सुरू होईल अशी भीती ऑटोवाल्यांना वाटते. किरण बेदींविरोधात हा अपप्रचार होत असल्याचा प्रचार आता भाजपने सुरू केला आहे.       
– चाटवाला

Story img Loader