भारताच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत जी २० शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी जगभरातील मंडळी दिल्लीत दाखल होणार आहेत. मात्र, त्याआधीच दिल्लीतील मेट्रा स्थानकांच्या अनेक भिंतींवर “दिल्ली बनेगा खलिस्तान” असं लिहिण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी याबाबत रविवारी माहिती दिली असून ही भित्तीचित्रे काढून टाकण्यात आल्याची माहिती मेट्रोतील अधिकाऱ्यांनी दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

दिल्लीतील पंजाबी बाग, शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, उद्योग नगर आणि महाराजा सूरजमल स्टेडिअमसह मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’, ‘खालिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा काळ्या रंगात लिहिलेल्या आहेत.

हेही वाचा >> “तडजोड करा, अन्यथा…”, मुस्लीम विद्यार्थ्याच्या वडिलांवर राजकीय दबाव वाढला; राकेश टिकैतांचाही हस्तक्षेप

दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानकांवर सिख फॉर जस्टिस या बंदी असलेल्या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीच ही भित्तीचित्रे रंगवली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच, नांगलोई येथील सरकारी सर्वोदय बाल विद्यालयाच्या भिंतींवरही भारतविरोधी भित्तीचित्रे रंगवली होती.

दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आता या प्रकरणात सक्रिय झाला असून विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संशयितांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अट केली जाईल, त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Story img Loader