पूर्वी प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत ‘अगली बारी अटलबिहारी’ हाच भारतीय जनता पक्षाचा नारा असे. यावेळी मात्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांच्या नावांची जोरदार हवा असतानाच आगामी निवडणुकीनंतर लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन होईल, असे वक्तव्य भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष विजय गोयल यांनी केल्याने पक्षातच खळबळ उडाली. अर्थात आपल्याला अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, असे म्हणायचे होते, अशी सारवासारव गोयल यांनी केली असली तरी या स्पर्धेत अडवाणीही ताकदीनिशी उतरणार असल्याचेच संकेत त्यातून मिळत आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार स्थापन केले जाईल, असे वक्तव्य दिल्ली भाजपचे प्रमुख विजय गोयल यांनी शनिवारी भर कार्यक्रमात केल्याने पक्षात गदारोळ माजला. मात्र आपल्या वक्तव्याचे गांभीर्य लक्षात येताच गोयल यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त देशभर भाजपच्या शाखांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. दिल्ली भाजपने यानिमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि लालकृष्ण अडवाणी व्यासपीठावर होते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा करावी असा जोरदार मतप्रवाह पक्षात असतानाच गोयल यांनी हे विधान केल्याने खळबळ माजली.
केंद्रातील पुढील सरकार अडवाणी यांच्या नेतृत्वाखालीच स्थापन केले जाईल, अन्य कोणाच्याही नाही, असे वक्तव्य गोयल यांनी केले. गोयल यांचे वक्तव्य विविध वाहिन्यांवरून प्रक्षेपित होताच पक्षात खळबळ माजली. त्यानंतर गोयल यांनी सारवासारव सुरू केली. पुढील सरकार अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होईल म्हणजे अडवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन होईल, असे आपल्याला म्हणावयाचे होते, असे गोयल म्हणाले.
गोयल यांनी आपल्या भाषणात वाजपेयी आणि अडवाणी यांची स्तुती केली. या दोन्ही नेत्यांनी पक्षाला वेळोवेळी मागदर्शन केले आहे. मात्र आता वाजपेयी यांची प्रकृती ठीक नसल्याने पुढील सरकार स्थापन करण्यासाठी अडवाणी मार्गदर्शन करतील, असे गोयल म्हणाले.
मरणासन्न काँग्रेसला मोदी यमराजच वाटणार!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना काँग्रेस नेते यमराजाची उपमा देत असल्याबद्दल पक्षाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी रामपूर येथे टोलेबाजी केली. मरणासन्न काँग्रेसला मोदी यमराजासारखेच भासत आहेत, यात नवल नाही. या निवडणुकीत ते काँग्रेसला संपवतीलच, असे नक्वी म्हणाले.१९८४ मध्ये दंगली माजवून काँग्रेसने घडविलेले शीखांचे हत्यासत्र लोक विसरलेले नाहीत, असेही ते म्हणाले.

Story img Loader