देशभरात १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशभरात हा दिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरू हे मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते, त्यांना मुलं प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा देशभर बालदिन म्हणून सादरा केला जातो. मात्र, आता त्यावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. बालदिन १४ नोव्हेंबर ऐवजी २६ डिसेंबर रोजी साजरा केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय, एकाच कुटुंबाच्या नावे राजकारण करता यावं म्हणून ही पद्धत पाळली जात असल्याचा दावा देखील भाजपाकडून करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी देखील अशाच स्वरूपाची मागणी केली होती. त्यानंतर आता पश्चिम दिल्लीमधील भाजपाचे खासदार परवेश वर्मा यांनी ही मागणी केली आहे. त्यांच्या मते १४ नोव्हेबंर ऐवजी २६ डिसेंबर या दिवशी देशभरात बाल दिन साजरा केला पाहिजे. यासाठी त्यांनी कारण देखील दिलं आहे. गुरू गोविंद सिंग यांच्या चार मुलांनी धर्मासाठी या दिवशी आपल्या प्राणांची आहुती दिली होती, असं परवेश वर्मा म्हणाले आहेत.
राजकारणासाठीच या दिवसाची निवड?
परवेश वर्मा यांनी राजकीय फायद्यासाठीच काँग्रेसकडून या दिवसाची निवड करण्यात आल्याचा दावा केला आहे. “तसं तर सगळेच लहान मुलांवर प्रेम करतात. पण आपल्याला माहिती आहे की हे सर्व एकाच कुटुंबाच्या नावे शक्य तितका काळ राजकारण करता यायला हवं, म्हणून करण्यात आलं”, असा आरोप परवेश वर्मा यांनी केला आहे.
“१४ नोव्हेंबर हा दिवस बाल दिनाच्या ऐवजी चाचा दिवस म्हणून देखील पाळला जाऊ शकतो. कारण प्रेमाने सगळे नेहरूंना चाचा नेहरू म्हणत होते”, असं देखील परवेश वर्मा म्हणाले आहेत.
२६ डिसेंबरच का?
दरम्यान, २६ डिसेंबरला बाल दिन साजरा करण्यास का सांगत आहोत याचं सविस्तर स्पष्टीकरण परवेश वर्मा यांनी दिलं आहे. “या दिवशी गुरू गोविंद सिंग यांचे चार पुत्र साहिबजादे अजित सिंग (१८), साहिबजादे जुझार सिंग (१४), साहिबजादे जोरावर सिंग (९) आणि साहिबजादे फतेह सिंग (७) यांनी औरंहजेबाच्या राजवटीमध्ये धर्मासाठी मरण पत्करलं होतं”, असं ते म्हणाले. “बाल दिनाचा खरा हक्क गुरू गोविंदसिंग यांच्या चार मुलांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या दिवसाला जातो”, असं त्यांनी नमूद केलं.
२०१९ साली देखील दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी अशाच प्रकारची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. तसेच, परवेश वर्मा यांनी देखील याआधी पंतप्रधानांकडे अशी लेखी मागणी केली होती. आता पुन्हा एकदा आपण पंतप्रधानांना यासंदर्भात पत्र लिहिणार आहोत, असं देखील ते म्हणाले.