२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘दिल्ली’च्या तख्तावर नरेंद्र मोदी विराजमान होणारच, असे जणू गृहीत धरलेल्या भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यावरून नाकीनऊ आले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक असलेले प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांचे नाव घोषित केले न गेल्याने गोयल यांच्या समर्थक १३ जिल्हाध्यक्षांनी भाजपचे माजी अध्यक्ष आणि दिल्लीचे प्रभारी नितीन गडकरी यांच्याविरोधात बंडखोरीची तलवार उपसली आहे.
मतदानाला ४२ दिवसांचा कालावधी असताना नवी दिल्ली जिल्हा वगळता उर्वरित १३ जिल्ह्य़ांतील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारातून अंग काढून घेतल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे धाबे दणाणले आहे. तर गोयल यांच्या या बंडाळीमुळे काँग्रेसचे मनोधर्य वाढले आहे. या सर्व जिल्हाध्यक्षांची नियुक्ती गोयल यांनीच केली असली तरी आंदोलनाचा फटका पक्षाला बसणार आहे.
निवडणूक प्रचारासाठी भाजपने ‘घर घर चलो अभियान’ सुरू केले आहे. या १३ जिल्हाध्यक्षांनी १७  ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेवर बहिष्कार टाकत ‘घर बठो अभियान’ छेडले आहे! ही बंडाळी मोडण्यात अपयश आल्यास कर्नाटक व उत्तराखंडपाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाचे खापर गडकरींच्या डोक्यावर फोडण्याची नामी संधी पक्षांतर्गत गडकरी विरोधकांना मिळेल. त्यामुळे गडकरी समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अध्यक्ष असताना गडकरी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल ऊर्फ नि:शंक यांना पदावरून दूर केले होते. उभय नेत्यांची नाराजी ओढाल्याने दोन्ही राज्यातील सत्ता भाजपने गमावली होती.
गेले वर्षभर गोयल हे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या आविर्भावात वावरत होते. मात्र त्यांच्याऐवजी डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडेच केंद्रीय नेतृत्वाचा कल असून त्यांच्या नावाची घोषणा एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असल्याने गोयल समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्यातरी गोयल समर्थकांची बंडखोरी ‘घर बठो अभियाना’पुरती मर्यादित असली तरी हर्ष वर्धन यांचा नावाची घोषणा होताच सामूहिक राजीनाम्याचे ब्रह्मास्त्र गडकरींवर सोडण्याची रणनीती आखण्यात आली आहे.  
विजय गोयल यांनी अध्यक्ष राजनाथ सिंह, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्याकडे हर्ष वर्धन यांच्याविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली होती. हर्ष वर्धन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील तर माझ्याकडून फारश्या अपेक्षा करू नका, असे गोयल यांनी पक्षनेतृत्वाला ठणकावले होते. त्याचा परिणाम न झाल्यानेच गोयल समर्थकांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा