Delhi Blast Near CRPF School : दिल्लीमधील रोहिणी परिसरातील प्रशांत विहार भागात सकाळी पावणे आठच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शाळेच्या भिंतीजवळ हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर आकाशात दूरवर मोठमोठे धुराचे लोट पसरले होते. हे चित्र पाहून रोहिणी परिसरातील लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र हा स्फोट इतका मोठा होता की आसपासच्या घरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत, अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत.

रोहिणीचे पोलीस पोलीस उपायुक्त अमित गोयल या घटनेची माहिती देताना म्हणाले, “आम्ही या स्फोटाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केलं आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही या परिसरात पोलिसांची मोठी तुकडी तैनात केली आहे. तज्ज्ञांचं पथक तपासाअंती या प्रकरणाची माहिती देईल”. दरम्यान, स्थानिकांनी सकाळी ७.५० च्या सुमारास अग्निशमन दलाला या स्फोटाची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची दोन वाहनं घटनास्थळी रवाना करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली. तिथे कुठेही आग लागल्याचं किंवा इमारतीचं नुकसान झालेलं नसल्याचं निदर्शनास आलं.

हे ही वाचा >> अमेरिका : फुटबॉल सामन्यानंतर मैदानात अंधाधुंद गोळीबार, तिघे ठार, आठ जण जखमी

घटनास्थळावरील ‘पांढऱ्या पावडर’मुळे फॉरेन्सिक टीम चकीत

अग्निशमन दलाच्या पथकाने व एनसजी, दिल्ली पोलीस, एफएसएलच्या (Forensic Science Laboratory) पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. या शोधमोहिमेत त्यांना काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत. इडिया टूडेच्या वृत्तानुसार, या घटनेचा तपास करणाऱ्या पथकाला घटनास्थळी पांढऱ्या रंगाची पावडर सापडली आहे. भिंतींवरही या पावडरचे कण सापडले आहेत. फॉरेन्सिक टीम या पावडरची तपासणी करत आहे. हा विस्फोटक पदार्थ होता का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काही सूत्रांनी म्हटलं आहे की गावठी स्फोटकांच्या मदतीने हा स्फोट घडवून आणला असावा.

हे ही वाचा >> भाजपा नेत्याच्या घरी येणार पाकिस्तानी सून; नुकताच पार पडला ऑनलाईन विवाह; पाहा VIDEO

मोठ्या दहशतवादी कटाचा संशय

सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत झालेल्या या स्फोटामागे दहशतवादी कट होता का? किवा हा स्फोट म्हणजे एखाद्या कटाची तयारी होती का? ते दखील तपासलं जात आहे. ही कुठल्या हल्ल्याची तयारी होती का हे शोधण्यासाठी पोलीस व एनएसजीचं पथक गुप्तचर यंत्रणांबरोबर काम करत आहेत. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचं (एफएसएल) पथक घटनास्थळावरील प्रत्येक संशयास्पद वस्तूची तपासणी करत आहे.

सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असावा असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, हा सिलेंडर स्फोट नसल्याचं तपासात उघड झालं आहे. तसेच पोलीस या भागातील सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.