Delhi Crime News: राजधानी दिल्लीमध्ये एका प्रियकराचा धक्कादायक रीतीने मृ्त्यू ओढवल्याची घटना घडली आहे. प्रेयसीनं आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाचा व्हिडीओ प्रियकराला पाठवला. ते पाहून त्यानं धावत तिला रुग्णालयात पोहोचवलं. पण आपल्या प्रेयसीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून प्रियकराचाच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्जुन असं या प्रियकराचं नाव आहे. शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या जगतपुरी भागामध्ये हा प्रकार घडला. सदर तरुणीवर रुग्णालयात उपचार चालू असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, या दोघांची ओळख ऑनलाईन सोशल मीडियावर झाली. कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण त्यांच्यात वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होत असतं. अर्जुनची नोकरी व त्याच्या सतत पार्टी करण्याच्या सवयीवरून हे वाद होत असत. दुसरीकडे तरुणी कायद्याचं शिक्षण घेत होती व त्यातच तिला करीअर घडवायचं होतं. पण शुक्रवारी त्या दोघांमध्ये झालेल्या भांडणाचा शेवट अर्जुनच्या मृत्यूनं झाला.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
शुक्रवारी अर्जुनचं त्याच्या प्रेयसीशी पुन्हा भांडण झालं. तिचे अर्जुनच्या काही नातेवाईकांशीही वाद झाले. त्यानंतर ती घरी गेली. रात्री साडेअकराच्या सुमारास अर्जुनच्या व्हॉट्सअॅपवर प्रेयसीनं एक व्हिडीओ पाठवला. व्हिडीओ पाहून अर्जुनला धक्का बसला. सदर तरुणीनं हाताची नस कापून घेतली होती. हे भीषण कृत्य करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिनं अर्जुनला पाठवला होता.
व्हिडीओ पाहून अर्जुन लागलीच तरुणीच्या मदतीसाठी निघाला. वाटेत त्यानं तरुणीच्या आईलाही याबाबत माहिती दिली. तरुणीच्या घरून त्यानं आपल्या प्रेयसीला नजीकच्या गुरू तेग बहादूर रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा पहाटेचे पावणेतीन वाजले होते. तिथे पोहोचल्यावर अर्जुननं रुग्णालयातील डॉक्टरांना नेमकं काय घडलं ते सगळं सांगितलं.
…आणि अर्जुन खाली कोसळला!
प्रेयसीला रुग्णालयात पोहोचवल्यानंतर अर्जुननं सगळा प्रकार कथन केला. सगळं सांगून झाल्यावर त्यानं पुन्हा एकदा आपल्या प्रेयसीकडे पाहिलं आणि क्षणार्धात तो खाली कोसळला. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना काही कळायच्या आत अर्जुनची अवस्था बिकट झाली. शेवटच्या क्षणी तो फक्त “तिला वाचवा, ती मरेल” एवढंच म्हणाला. अर्जुनचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. सदर तरुणीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून तिचं समुपदेशन चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.