Mahila Samridhi Yojana : दिल्लीमधील नवनिर्वाचित भाजपा सरकारने आज त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री व अर्थमंत्री रेखा गुप्ता यांनी तब्बल १ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये दिल्लीतील पायाभूत सुविधा व महिला वर्गासाठीच्या ‘महिला समृद्धी योजने’साठी गुप्ता यांनी सरकारी तिजोरी उघडली आहे. महिला समृद्धी योजनेसाठी त्यांनी ५,१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के मोठा अर्थसंकल्प यंदा सादर करण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाने महिलांसाठी महिला समृद्धी योजनेची घोषणा केली होती. त्याचा निवडणुकीच्या मतदानावर चांगलाच परिणाम झाला. दशकभरापासून दिल्लीत सत्तेपासून दूर असलेली भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेत आली आहे. राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर सरकारने या महिला समृद्धी योजनेसाठी महिलांची नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, आता लवकरच या योजनची अंमलबाजवणी सुरू होईल, असं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विधानसभेत जाहीर केलं.

महिला समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला २,५०० रुपये दिले जाणार

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांमधील महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला २,५०० रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहन’ व ‘महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजने’च्या धरतीवर भाजपाने ही योजना आणली आहे.

दिल्लीकरांसाठी हजारो कोटी रुपयांच्या योजना

दिल्लीमधील सांडपाण्याची व्यवस्था सुधारण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी एक हजार कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. राजधानीत १०० ठिकाणी अटल कॅन्टीन सुरू केले जाणार असून यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दिल्लीकरांच्या सुरक्षिततेसाठी शहरात ५० हजार अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. गर्भवती महिलांसाठी २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी ६९६ कोटी रुपये, पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या कामांसाठी ९,००० कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी वेगळी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.