दिल्लीमधील बुराडी सामूहिक मृत्यू प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्येसाठी सर्वांना प्रवृत्त करण्याचा संशय असणारा ललित जर हा प्रयत्न यशस्वी झाला असता, तर त्याची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत होता. ललितच्या सांगण्यावरुन आत्मामुक्तीसाठी घरात ‘बाध तपस्या’ (सात दिवस वडाच्या झाडाची पूजा) विधी करण्यात आला. ११ जणांनी गळफास घेतल्यास आत्मामुक्ती होईल या अंधश्रद्धेपोटीच ११ जणांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची शंका आहे. महत्वाचं म्हणजे आर्थिक समस्येत असणाऱ्या सासरीदेखील हा विधी केल्यास त्यांचीही समस्येतून मुक्तता होईल असा त्याचा दावा होता.
ललित याने आपल्या डायरीत लिहिल्याप्रमाणे, वडिलांसाह काही पुर्वजांच्या आत्म्याला अजूनही मुक्ती मिळाली नसून त्यांचे आत्मे घरामध्येच अडकले आहेत. त्यांना मुक्ती देण्यासाठी घरात ‘बाध तपस्या’ विधी करण्यात आला होता. हा विधी यशस्वी झाला असता तर ललित आपली पत्नी टीनाच्या घरीदेखील याची पुनरावृत्ती करणार होता. पत्नीच्या घऱी असलेली आर्थिक समस्या यामुळे सुटेला असा त्याचा दावा होता.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललितने डायरीत लिहिलं होतं की वडिलांकडून त्याला बाध तपस्या विधी करण्याचा आदेश मिळाला होता. ज्यामुळे घरात अडकलेल्या पुर्वजांच्या आत्मा मुक्त होतील. डायरीत सज्जन सिंह, हिरा, दयानंद आणि गंगा देवी यांचं नाव लिहिण्यात आलं आहे. ललितला आत्महत्येचा प्रयत्न केल्यास कुटुंबाला कोणतीही इजा होणार नाही याची खात्री होती असं डायरीतून स्पष्ट होत आहे. पोलीस सध्या डायरीत उल्लेख असणाऱ्यांचा कुटुंबाशी काय संबंध होता याचा तपास करत आहे.
‘माझ्यासोबत चार आत्मा भटकत आहेत’….डायरीच्या सुरुवातीलाच हे वाक्य लिहिण्यात आलं आहे. ९ जुलै २०१५ मध्ये लिहिण्यात आलेल्या या नोंदीत ललितने आपल्या वडिलांची आत्मा आपल्याशी संवाद साधत असल्याचा दावा केला आहे. ‘भेदभाव असतानाही कुटुंब एका छताखाली नांदत असल्याचा मला आनंद आहे. जर तुम्ही तुमचा दृष्टीकोन बदलला तर आम्हाला शांती मिळेल. तुम्ही हरिद्वारला जाऊन अंत्यविधी करण्याचा विचार करताय, पण मी बाध तपस्या पूर्ण होण्याची वाट पाहतोय’, असं डायरीत लिहिलं आहे.
ललितची अजून एक नोंद सापडली असून त्यात त्याने बाध तपस्या चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचं म्हटलं आहे. ‘सर्व ११ जण एका भावनेने रांगेत उभे आहेत याचा ईश्वराला आनंद आहे. ही बाध तपस्या मोठमोठ्या समस्यांवरील उपाय आहे’, असं यात लिहिलं आहे.
मृतांची नावे – नारायण देवी (७७), त्यांची मुलगी प्रतिभा (५७), दोन मुलं भावनेश (50) आणि ललित भाटिया (४५), भावनेशची पत्नी सविता (४८) आमि त्यांची तीन मुलं मीनू (२३), निधि (२५) आणि ध्रुव (१५), ललित भाटियाची पत्नी टीना (४२) आणि त्यांचा १५ वर्षीय मुलगा शिवम , प्रतिभाची मुलगी प्रियंका (३३). प्रियंकाचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता. वर्षाच्या शेवटी तिचं लग्न होणार होतं.