कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या गाड्यांच्या ताफ्याला ओलांडून पुढे निघून गेल्यामुळे दिल्लीतील एका व्यावसायिकाकडून पोलीसांनी दंड वसूल केला. भरधाव वेगाने गाडी चालविल्याच्या आरोपावरून दंड वसूल करण्यात आला. सौरभ रस्तोगी असे या व्यावसायिकाचे नाव असून, ते पश्चिम विहार भागात राहतात.
वद्रा यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांनी त्यांच्या मागून एक गाडी वेगाने पुढे गेल्याची माहिती दिल्लीतील वाहतूक पोलीसांना दिली. त्यावरून पोलीसांनी रस्तोगी यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना अडवले आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला. या घटनेबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एक पोलीस अधिकारी म्हणाला, रस्तोगी हे मोदी मिल फ्लायओव्हरवरून लाजपतनगरकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीपुढे वद्रा यांच्या गाड्यांचा ताफा होता. या ताफ्याला ओलांडून पुढे जाण्यासाठी रस्तोगी आपल्या गाडीचा हॉर्न सातत्याने वाजवत होते. मात्र, त्यांना पुढे जाण्यासाठी संधी मिळत नसल्याने त्यांनी गाडीचा वेग वाढवून वद्रा यांच्यासोबत असलेल्या गाड्यांच्या ताफ्याला ओव्हरटेक केला. यानंतर वद्रा यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांनी दिल्ली पोलीसांना त्याची माहिती दिली. यानंतर वाहतूक पोलीसांनी रस्तोगी यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना थांबविले आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा