Farmers Delhi Chalo Protest : शेतमालाला हमीभाव आणि स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला असून त्यांना हरियाणाच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. आज हरियाणा सीमेवर आंदोलन सुरू असताना एका २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी मात्र ही अफवा असल्याचे सांगून या वृत्ताला दुजोरा दिला नाही. या सर्व घडामोडीदरम्यान शेतकरी नेत्यांनी दिल्लीकडे वळविलेला मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरविली जाईल, असे शेतकरी नेत्यांनी जाहीर केले.

शेतकरी नेते बलदेव सिरसा यांच्या माहितीनुसार, भंटिडा येथील २३ वर्षीय शुभकरण सिंग याचा खनौरी सीमेजवळ बुधवारी मृत्यू झाला. पटियाला मधील रांजेद्र रुग्णालयाचे अक्षिष्ठाता एचएस रेखी यांनी सांगितले की, खनौरी हॉस्पिटलमध्ये तीन जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. रेखी यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या डोक्यावर जखम झाली होती. इतर दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान हरियाणा पोलिसांनी एक्स अकाऊंटवर एक ट्विट टाकत सीमेवरील आंदोलनात मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला. एक्सवरील पोस्टमध्ये पोलिसांनी लिहिले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कुणाच्याही मृत्यूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. ही फक्त एक अफवा आहे. दाता सिंह – खनौरी सीमेवर दोन पोलीस कर्मचारी आणि एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित

शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी सांगितले की, दिल्ली मोर्चा आम्ही दोन दिवसांसाठी स्थगित करत आहोत. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनाची पुढची रणनीती जाहीर केली जाईल. मागच्या रविवारी शेतकरी नेते आणि सरकारमधील मंत्र्यांदरम्यान चर्चेची चौथी फेरीही अपयशी ठरली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा हरियाणाच्या सीमेवरून दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न सुरू केला. सरकारकडून पुन्हा एकदा पाचव्या फेरीच्या चर्चेचे आवाहन केले आहे.

Story img Loader