नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागलेल्या काँग्रेसने पक्षांतर्गत बदल करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली व छत्तीसगढ या राज्यांमध्ये पराभव झाल्याने या राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहेत.
गेली १५ वष्रे दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. मात्र यंदा पक्षाला या राज्यात सत्तेपासून दूर राहावे लागल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. अगरवाल यांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या जागी माजी मंत्री आणि सध्याचे आमदार अरविंदरसिंग लवली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १९८६पासून लवली हे राजकारणात असून, ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय माकन यांचे ते निकटवर्तीय आहेत. २००३मध्ये शीला दीक्षित यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी वाहतूक, शिक्षण आणि महसूल या खात्यांचा कारभार सांभाळला आहे.
छत्तीसगढच्या प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे माजी मंत्री भूपेश बाघेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाघेल यांनी निवडणुकीमध्ये प्रचार कार्यक्रम समन्वयकाची भूमिका निभावली होती. केंद्रीय मंत्री चरणदास महंत यांच्याकडे आधी छत्तीसगढचे प्रदेशाध्यक्षपद होते.
काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी याबाबतची घोषणा केली. विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानंतर हे बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.