Uniform Civil Code: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारादरम्यान गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याबाबत त्यांनी भाजपावर हल्ला चढवला आहे. गुजरातमध्ये हा कायदा अंमलात आणण्याबाबत भाजपा जनतेची फसवणूक करत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. भाजपाशासित राज्य सरकारच्या हेतूवर त्यांनी शंका उपस्थित केली आहे. “उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाने हेच आश्वासन दिलं होतं. पण निवडणुका जिंकल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही”, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
गुजरात सरकार ‘समान नागरी कायदा’ लागू करण्याच्या तयारीत, घेतला महत्त्वाचा निर्णय
केजरीवाल गुजरातच्या भावनगरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. “समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे. संविधानाच्या कलम ४४ मध्ये हा कायदा लागू करणं राज्याची जबाबदारी असल्याचं स्पष्ट नमुद करण्यात आलं आहे. मात्र हे सर्वांच्या संमतीनं आणि सल्लामसलतीनं झालं पाहिजे”, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
गुजरात सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबतची माहिती शनिवारी गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली आहे. गुजरात सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
समान नागरी कायदा काय आहे?
‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ अर्थात समान नागरी कायदा अस्तित्वात आल्यास हिंदू विवाह कायदा, हिंदू कुटुंब कायदा, मुस्लीम पर्सनल लॉसह अल्पसंख्याकांचे अन्य कायदे रद्द होतील. याऐवजी एकच कायदा अस्तित्वात येईल. गेल्या अनेक वर्षांपासून हा कायदा लागू करण्याबाबत देशात चर्चा सुरू आहे. मात्र, या कायद्याला समाजातील काही घटकांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे.