दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सिसोदिया यांनी भ्रष्टाचार आणि दारू माफियांना आश्रय दिल्याचा आरोप सक्सेना यांनी केला आहे. तसेच दिल्ली सरकारच्या वादग्रस्त नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील सक्सेना यांनी केली आहे. सक्सेना यांच्या आरोपांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं आहे. सर्व आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, मनीष सिसोदिया यांनी दिल्लीची शिक्षण व्यवस्था सुधारवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. यामुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. तसेच त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे, म्हणूनच केंद्र सरकार त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावण्यात येत आहेत. मनीष सिसोदिया हे सकाळी सहा वाजता उठून शाळांचा दौऱ्यावर जातात. असा कोणता भ्रष्टाचारी नेता आहे, जो एवढ्या सकाळी उठून दौरे करतो? असा सवालही केजरीवाल यांनी यावेळी विचारला आहे.

हेही वाचा- विश्लेषण : काली बेई नदीतील पाणी प्यायल्याने पंजाबचे CM भगवंत मान रुग्णालयात दाखल? शिखांसाठी ही नदी पवित्र का आहे?

केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडताना केजरीवाल म्हणाले, “आम्ही तुरुंगवासाला घाबरत नाही, हे या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात, आम्ही भगतसिंग यांची मुलं आहोत. भगतसिंग यांनाच आम्ही आमचा आदर्श मानतो. ज्यांनी इंग्रजांसमोर नतमस्तक व्हायला नकार दिला आणि फासावर गेले. तुमच्या तुरुंगवासाला आणि फाशीला आम्ही घाबरत नाही, आम्ही अनेकदा तुरुंगात जाऊन आलो आहोत” असंही केजरीवाल म्हणाले.

हेही वाचा- “संविधानाच्या न्यायासाठी मोठा लढा द्यावा लागेल” संजय राऊतांचं केंद्र सरकारवर टीकास्त्र!

“दिल्लीच्या विकास मॉडेलमुळे आम आदमी पार्टीची मतदारांमध्ये लोकप्रियता वाढत आहे. तसेच आम आदमी पार्टीला निवडणुकीत मिळालेलं यश पाहून केंद्र सरकार घाबरलं आहे. त्यामुळे ते आम्हाला लक्ष्य करत आहेत आणि आमच्या आमदारांना तुरुंगात टाकत आहेत” असा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.