नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे. ‘जायंट किलर’ प्रवेश वर्मा, माजी विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे शपथविधीसाठी घाई केली जाणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्याहून परतल्यानंतरच हा भव्य सोहळा होईल, अशी शक्यता आहे.
भाजपला दिल्लीमध्ये २७ वर्षांनंतर सत्ता मिळाली असल्यामुळे शपथविधीचा दिमाखदार शपथविधी सोहळा करण्याचा भाजप नेतृत्वाचा मानस आहे. सोहळ्याला भाजपचे सर्व मुख्यमंत्री, ‘एनडीए’च्या घटक पक्षांचे नेते यांना आमंत्रित केले जाणार आहे. पंतप्रधान १२ व १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ते भेट घेणार आहेत. त्यामुळे ते दिल्लीला परतल्यानंतर, १५ फेब्रुवारी किंवा त्यानंतर राजधानीला नवा मुख्यमंत्री मिळू शकेल, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेलाही रविवारी वेग आला असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संभाव्य नावांबाबत चर्चा केल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे दिल्ली भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या सर्व नवनियुक्त आमदारांची प्रभारी जय पांडा यांनीही बैठक घेतली.
नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा हे मुख्यमंत्रीपदाचे आघाडीचे दावेदार मानले जात आहेत. त्यांचे वडील व दिग्गज जाट नेता साहिबसिंह वर्मा दिल्लीचे मुख्यमंत्री होते. माजी विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता हे २०१५ व २०२०च्या निवडणुकांमध्ये ‘आप’च्या झंझावातही विजयी झाले होते. माजी प्रदेशाध्यक्ष व जुनेजाणते ब्राह्मण नेता सतीश उपाध्याय यांचेही नाव स्पर्धेत असून पंजाबी शीख नेत्याचा विचार केला गेला तर मनजिंदर सिंह सिरसा यांना संधी दिली जाऊ शकते. नव्या विधानसभेचे सदस्य नसलेल्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची तयारी असेल, तर प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, खासदार मनोज तिवारी व रामवीरसिंह बिधुडी यांचाही संभाव्य नावांमध्ये समावेश होऊ शकतो.
महिला नेतृत्वाचाही विचार : भाजपने महिला मुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतल्यास ग्रेटर कैलाशमध्ये आपचे दिग्गज नेते सौरभ भारद्वाज यांना पराभूत करणाऱ्या शिखा रॉय यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय माजी खासदार स्मृती इराणी यांचेही नाव चर्चेत असल्याचे पक्षात बोलले जात आहे.