Delhi Election Result PM Narendra Modi : राजधानी दिल्लीत भाजपाने बहुमत मिळवल्याने त्यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीत नवे मुख्यमंत्री कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असून नव्या मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी कधी होणार याबाबतही उत्सुकता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्याहून आल्यानंतर मुख्यमंत्र्‍याचा शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

शनिवारी दिल्लीच्या मतमोजणीत ७० सदस्यांच्या विधानसभेत ४८ जागा जिंकून भाजपाने २७ वर्षांची प्रतीक्षा संपवून दिल्लीत पुन्हा एकदा सत्ता मिळवली. गेल्या एक दशकापासून शहरात राज्य करणाऱ्या ‘आप’ने २२ जागा जिंकल्या, तर पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह प्रमुख नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या भाजपाने सरकारप्रमुख निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठका सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये पाच नेते प्रमुख दावेदार म्हणून समोर येत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत कोण कोण?

नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवाल यांचा पराभव करून जायंट किलर म्हणून उदयास आलेले परवेश वर्मा हे दिल्लीतील संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहेत. दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेले भाजपाचे वरिष्ठ नेते विजेंदर गुप्ता, पूर्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले प्रमुख ब्राह्मण चेहरा सतीश उपाध्याय, केंद्रीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले दिल्ली भाजपाचे सरचिटणीस आशिष सूद आणि वैश्य समुदायातील संघाचे मजबूत हात असलेले जितेंद्र महाजन हे इतर दावेदार आहेत.

पंतप्रधान मोदी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पहिली भेट घेण्यासाठी १२-१३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला जाणार आहेत. पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पुढील आठवड्यात पक्ष सत्तेवर दावा करण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर शपथविधी होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, मुख्यमंत्री निवडीचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला पाहिजे, तसेच सर्वोच्च पदावर एक नवीन चेहरा येण्याची शक्यताही त्यांनी सुचवली.
शनिवारी संध्याकाळी, पंतप्रधानांनी पक्षाच्या मुख्यालयात गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर नेत्यांसोबत बैठक घेतली. तथापि, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आणि सरकार स्थापनेवर चर्चा केली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Story img Loader