दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत त्यांनी ही मागणी केली आहे. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे असं ते म्हणाले आहे. यासंबंधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आल्याचं सांगितलं. अनेक लोकांशी आपली याबाबत चर्चा झाली असून, कोणीही त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचा उल्लेख करताना केजरीवाल यांनी देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तरच प्रयत्नांना यश मिळतं सांगत हा सल्ला दिला.

पुढच्या लक्ष्मीपूजनाला ‘डिजिटल रुपया’?

केजरीवालांनी सांगितलं की “भारत एक श्रीमंत देश व्हावा आणि प्रत्येक भारतीय कुटुंब श्रीमंत व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. यासाठी अनेक पावलं उचलण्याची गरज आहे. आपल्याला मोठ्या संख्येने शाळा, रुग्णालयं हवी आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. पण देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तेव्हाच याचा प्रयत्नांना यश मिळेल. अनेकदा प्रयत्न करुनही आपल्याला यश मिळत नाही. तेव्हा देवी-देवतांचा आशीर्वाद असेल तर परिणाम दिसतील असं वाटत असतं”.

पुढे ते म्हणाले की “परवा दिवाळी होती. आपण सर्वांनी गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. सुख आणि शांतीसाठी प्रार्थना केली. व्यापारी तसंच इतर सर्वजण लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवत असल्याचं आपण पाहतो. रोज सकाळी काम सुरु करण्याआधी त्यांची पूजा करतात. आज माझं केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना आवाहन आहे की, भारतीय चलनावर गांधींजींचा फोटो आहे तो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला गणपती आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावला जावा. जसं मी म्हटलं की, अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. पण सोबतच देवी-देवतांचे आशीर्वादही हवे आहेत”.

उभरत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताच्या चलन गंगाजळीला सर्वाधिक झळ

“जर भारतीय चलनावर एका बाजूला गांधी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी, गणपतीचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल,” असा विश्वास केजरीवालांनी व्यक्त केला आहे.

केजरीवालांनी यावेळी इंडोनेशियाचंही उदाहरण दिलं. “सर्व नव्या नोटा बदला असं आमचं म्हणणं नाही. पण नव्या नोटांवर हे फोटो छापत सुरुवात करु शकतो. इंडोनेशियात ८५ टक्के मुस्लीम आणि दोन टक्के हिंदू लोकसंख्या आहे. मात्र तरीही त्यांनी नोटेवर गणपतीचा फोटो छापला आहे. मी देशातील १३० कोटी जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करत आहे,” असं केजरीवाल म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cm aap arvind kejriwal demands laxmi and ganesh photo on currency notes sgy
Show comments