दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा आरोप केला आहे की भाजपात प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे. भाजपात गेलं तर सगळे खून माफ होतात, आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही काहीही झालं तरीही झुकणार नाही, असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
“आजकाल हे लोक (भाजपा) आमच्या मागे लागले आहेत. तुम्ही वर्तमान पत्रांमध्ये वाचलं असेल, मनीष सिसोदियांना यांनी तुरुंगात धाडलं. हे म्हणतात सिसोदियांनी भ्रष्टाचार केला आहे. सकाळी सहा वाजता ते शाळा-शाळांमध्ये जात होते. कुठला भ्रष्टाचारी सकाळी शाळांमध्ये जातो. जो भ्रष्टाचार करतो तो मद्यपान करतो, त्याला बाकीचीही नको ती व्यसनं असतात, तसंच तो चुकीची कामं करतो. आम्ही काय केलं आहे यातलं? आम्ही दिल्लीच्या विकासासाठी काम करतोय तरी हे आमच्या मागे लागले आहेत. ” असं म्हणत केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली,
मनिष सिसोदिया आणि सत्येंद जैन यांचं काय चुकलं?
या लोकांनी (भाजपा) सगळ्या एजन्सीज माझ्या मागे लावल्या आहेत. मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवल्यानंतर आता हे सगळे माझ्या मागे लागले आहेत. चांगल्या शाळा बांधणं हा सिसोदियांचा अपराध ठरला आहे. सत्येंद्र जैन रुग्णालयातल्या व्यवस्था चांगल्या कशा होतील आणि मोहल्ला क्लिनिक कशी तयार होऊन गरीबांना मदत मिळेल यावर भर देत होते, त्यांचा तो गुन्हा ठरला. त्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकलं आहे असाही आरोप केजरीवाल यांनी केला.
हे पण वाचा- ‘ईडी’ केजरीवाल यांच्याविरुद्ध न्यायालयात
भाजपाचं माझ्याविरोधात षडयंत्र
पुढे केजरीवाल म्हणाले, “यांनी (भाजपा) माझ्याविरोधात षडयंत्रं रचली. जर शाळा आणि रुग्णालयं बांधत आहोत तर आम्ही काय चुकीचं करतो आहोत. तुम्ही या अरविंद केजरीवालला तुरुंगात पाठवा. तुम्ही आज आमचं काहीही बिघडवू शकत नाही. गरीब मुलांसाठी आम्ही शाळांची सोय केली आहे. त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद ही आमची ताकद आहे. ज्यांच्या मागे गरीबांच्या दुवा आणि आशीर्वाद असतात त्यांच्यामागे देवही उभा राहतो. कितीही षडयंत्र करा, मी इथे तुम्हाला तोंड द्यायला उभा आहे. मी यांच्याविरोधात झुकणार नाही. हे लोक सांगतात भाजपात या, सोडून देतो. मी सांगितलं मी मुळीच भाजपात येणार नाही. काहीही झालं तरीही भाजपात जाणार नाही. भाजपात गेलं की सगळे खून माफ होतात. आम्ही शाळा, रस्ते बांधले, रुग्णालयांमध्ये सोयी सुविधा केल्या आहेत. आम्ही काहीही चुकीचं वागलेलो नाही.” किराडी या ठिकाणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते दोन नव्या सरकारी शाळांचं भूमीपूजन कऱण्यात आलं त्यावेळी त्यांनी एक भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.