नवी दिल्ली : कथित मद्यघोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तिसऱ्या समन्सलाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केराची टोपली दाखवली. इतकेच नव्हे तर, ‘ईडी’च्या हेतूंवर शंका घेत प्रश्नावली पाठवून देण्याची मागणी पत्राद्वारे केली. या आक्रमक भूमिकेमुळे भाजपने केजरीवाल यांना ‘कट्टर बेईमान’, ‘पळपुटापणा’ असे टोमणे मारत राग व्यक्त केला.

‘ईडी’ने २२ डिसेंबरला समन्स बजावून केजरीवाल यांना ३ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, केजरीवाल बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. यापूर्वी ‘ईडी’ने २ नोव्हेंबर व २१ डिसेंबर रोजीही चौकशीसाठी बोलावले होते पण, केजरीवाल यांनी दोन्ही वेळा समन्स धुडकावून लावले होते. १९ जानेवारीला राज्यसभेची निवडणूक असून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आहेत. ‘आप’चा राष्ट्रीय समन्वयक व दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून राजकीय व सरकारी कामांमध्ये व्यग्र असल्याचे कारण देत केजरीवाल यांनी चौकशीसाठी येण्यास असमर्थता दाखवली आहे.

हेही वाचा >>> आसाममध्ये बस-ट्रकच्या अपघातात १२ जणांचा मृत्यू; अपघातग्रस्तांना पंतप्रधानांकडून मदत जाहीर

‘ईडी’ने पाठवलेले समन्स संदिग्ध असून आपल्याला आरोपी की साक्षीदार म्हणून चौकशीला बोलावले जात आहे, हे ‘ईडी’ने स्पष्ट करावे, अशी मागणी केजरीवाल यांनी बुधवारी ‘ईडी’ला पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. ‘ईडी’ने पारदर्शक राहिले पाहिजे, चौकशीसंदर्भात गोपनीयता राखली जाऊ नये. एखादी माहिती वा कागदपत्रे माझ्या असेल तर मी देऊ शकेन मात्र, त्यासंदर्भात ‘ईडी’ने माझ्याकडे प्रश्नावली पाठवावी, असेही पत्रात नमूद करून केजरीवाल यांनी ‘ईडीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चौकशीसाठी बोलावून केजरीवाल यांना अटक करण्याचा ‘ईडी’चा इरादा असल्याचा आरोप केजरीवाल सरकारमधील आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. मात्र, भाजपने केजरीवाल हे पुळपुटेपणा करत असल्याची टीका केली आहे. ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जाण्यापासून केजरीवाल का घाबरत आहेत? अण्णा हजारेंसोबत केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोहीम राबवली होती. त्यावेळी केजरीवाल यांनी भ्रष्ट मंत्र्यांविरोधात, आधी राजीनामा मग चौकशी अशी भूमिका घेतली होती. आता ते चौकशीसाठी देखील ‘ईडी’कडे जायला तयार नाहीत, अशी टीका भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केली.

Story img Loader