ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य घोटाळा प्रकरणात २१ डिसेंबरला चौकशीसाठी बोलवलं आहे. यासाठी त्यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे. याआधी अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ही नोटीस बेकायदेशीर असल्याचं सांगून नोटीस मागे घेण्याची मागणी केली होती.
संदीप पाठक यांनी काय म्हटलं आहे?
ईडीच्या नव्या नोटीसविषयी आपचे खासदार संदीप पाठक म्हणाले की जे प्रकरणच नाही तेच उभं केलं आहे. या प्रकरणाला काहीही अर्थ नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे प्रश्न विचारतात त्यांना ते तुरुंगात पाठवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अरविंद केजरीवाल यांचा तिरस्कार करतात. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अरविंद केजरीवाल यांना सर्वाधिक घाबरतात. त्यांच्यापुढे जे शरणागती पत्करतात त्यांना मोदी क्लिन चिट देतात. अरविंद केजरीवाल हे विपश्यनेसाठी जाणार आहेत आणि वकील नोटीस मिळाली आहे त्याचा अभ्यास करत आहेत. आता पाहू काय करायचं असं पाठक यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल ईडीसमोर जाणार का?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीच्या समोर हजर होणार की नाही? याविषयीचा सस्पेन्स कायम आहे. ईडीने २१ डिसेंबरला त्यांना हजर होण्यास सांगितलं आहे. अरविंद केजरीवाल हे १९ ते ३० डिसेंबर विपश्यना योग साधनेसाठी जातात. त्यांचा दौरा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे ते ईडीच्या समोर उपस्थित राहणार की नाही? याचा सस्पेन्स कायम आहे.
आम आदमी पार्टीने हा सगळा कट भाजपाने आखला असल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षांना जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातं आहे असाही आरोप या प्रकरणानंतर आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणी आपचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.