Delhi CM Atishi Video : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. यादरम्यान भाजपाचे माजी खासदार आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीची मुख्यमंत्री आतीशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान या विधानाबाबत बोलताना आतिशी यांना पत्रकार परिषदेत बोलताना रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले.
वडिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना आतिशी यांना अश्रू अनावर झाले. “मी रमेश बिधुरी यांना सांगू इच्छिते की माझ्या वडिलांनी जन्मभर शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी दिल्लीतील हजारो गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण दिले. आज ते ८० वर्षांचे आहेत. ते इतके आजारी असतात की आधाराशिवाय चालूही शकत नाहीत…. तुम्ही निवडणुकीसाठी इतकी लाजीरवाणी गोष्ट कराल? एका वृद्ध व्यक्तीला शिव्या द्याल? या देशातील राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल असे मला कधीही वाटले नव्हते”.
“रमेश बिधुरी स्वत: दक्षिण दिल्लीतून १० वर्ष खासदार राहिले आहेत. त्यांनी कालकाजी येथील जनतेला सांगावं की त्यांनी या भागातील लोकांसाठी काय केलं? त्यांनी दाखवावं की त्यांचे १० वर्षांचे जे काम आहे ते माझ्या ५ वर्षांच्या आमदार म्हणून केलेल्या कामापेक्षा खूप चांगले होते, त्या आधारावर मते मागावीत”, असेही आतिशी मार्लेना म्हणाल्या. आपल्या कामाच्या जोरावर मते मागा, माझ्या वृद्ध वडिलांना शिव्या देऊन ते मते मागत आहेत, अशी खंतही दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी यावेळी व्यक्त केली.
रमेश बिधुरी नेमकं काय म्हणाले होते?
आम आदमी पक्षाच्या नेत्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतात. दरम्यान भाजपा नेते रमेश बिधुरी यांनी या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार आतिशी मार्लेना सिंह यांच्यावर टीका केली आहे. एका जाहीर सभेत बोलताना बिधुरी यांनी केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर टीका केली. “आतिशी आधी मार्लेना होत्या, आता त्या सिंह झाल्या आहेत. त्यांनी स्वत:चा बापच बदलला. आतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूची फाशी रोखण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी अफझल गुरूमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता”, असे रमेश बिधुरी म्हणाले.
हेही वाचा>> TMC : तृणमूल काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार? ममता बॅनर्जी आणि अभिषेक यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ चर्चेत
प्रियांका गांधींबद्दलही बिधुरींचे आक्षेपार्ह विधान
रमेश बिधुरी यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. “मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन”, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाल्यानंतर बिधुरी यांनी दिलगिरी व्यक्त केली. “माझ्या शब्दांमुळे जर माता-भगिनींना किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. मी महिलांचा आदर करतो. पण काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही त्यांच्या ढासळत्या राजकीय स्थितीकडे पाहिले पाहीजे”, असे बिधुरी म्हणाले.