पीटीआय, नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रविवारी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना भेटून त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी लागलेल्या निकालात आम आदमी पक्षाने बहुमत गमावले असून २७ वर्षांनंतर भाजपला सत्ता मिळाली आहे. आतिशी यांनी राज निवास येथे नायब राज्यपालांची भेट घेतली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सक्सेना यांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले असल्याची माहिती नायब राज्यपालांच्या कार्यालयाने ‘एक्स’वरून दिली. आपच्या अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, सौरभ भारद्वाज अशा दिग्गज नेत्यांचा पराभव झाला असताना आतिशी यांना काल्काजी मतदारसंघ राखण्यात यश आले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रविवारी त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या विजयी उमेदवारांनी भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी त्यांना लोकांसाठी काम करण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा सल्ला दिला. पक्ष रचनात्मक विरोधक म्हणून काम करेल असे आतिशी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी सांगितले.
आप रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून काम करेल. भाजपने आश्वासन दिल्याप्रमाणे ते ८ मार्चपर्यंत महिलांना दरमहा २,५०० रुपये दिले जातील, ३०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जाईल आणि लोकांच्या इतर सुविधा कायम ठेवतील याची आम्ही खबरदारी घेऊ.
आतिशी, मावळत्या मुख्यमंत्री, दिल्ली
भाजप उमेदवारांचा विजयोत्सव
भाजपच्या विजयी उमेदवारांनी रविवारी आपापल्या मतदारसंघांमधून फेऱ्या काढल्या आणि मतदारांचे आभार मानले. तसेच मिठाई वाटून, केक कापून त्यांनी आपला आनंद साजरा केला. ‘‘मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. मी त्यांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे काम करेन, सार्वजनिक शौचालय व पाणीपुरवठ्यासारख्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करेन,’’ असे मोतीनगरचे नवनियुक्त आमदार हरिश खुराणा यांनी सांगितले.