Delhi CM Atishi : पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सिंघू बॉर्डरवरून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या सोनम वांगचुक यांची भेट घेण्यासाठी पालीस ठाण्यात पोहोचल्या असता पोलिसांनी मुख्यमंत्री आतिशी यांना अडवत सोनम वांगचुक यांना भेटण्यास परवानगी नाकारली. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे दिल्लीत चांगलंच राजकारण तापलं आहे.

मुख्यमंत्री आतिशी काय म्हणाल्या?

“पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे उद्या २ ऑक्टोबर रोजी दिल्लीत जाणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना पोलिसांनी अटक केली. एवढंच नाही तर पोलिसांनी मला देखील सोनम वांगचुक यांना भेटू दिले नाही. ही भारतीय जनता पक्षाची हुकूमशाही आहे. सोनम वांगचुक यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. लडाखमध्ये एलजी राजवट संपली पाहिजे आणि दिल्लीतील एलजी राजवटही संपली पाहिजे. मात्र, लोकांचा अधिकार काढून सर्व अधिकार दिल्लीच्या एलजींना दिले आहेत. आताही मला पूर्ण विश्वास आहे की, या पोलीस अधिकाऱ्यांना एलजी साहेबांचा फोन आला असेल आणि निवडून आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही सोनम वांगचुक यांना भेटू देऊ नका. मात्र, सोनम वांगचुक यांच्या अटकेची आणि आम्हाला त्यांना भेटू न दिल्याचा निषेध करत आहोत”, असं मुख्यमंत्री आतिशी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Supreme Court : “माझी वैयक्तिक विश्वासार्हता पणाला लागलीय, मला प्रत्येकासाठी…”, सरन्यायाधीशांनी वकिलांना फटकारलं

“सोनम वांगचुक हे पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. मग त्यांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं? आम्हाला त्यांना का भेटू दिले जात नाही? फक्त एकाच कारणासाठी आम्हाला भेटू दिले जात नाही की भारतीय जनता पार्टी ही जनतेच्या आवाजाला घाबरते. मात्र, लडाखमध्ये देखील एलजीची राज संपेल, दिल्लीतीलही एलजीची राज संपेल आणि केंद्र सरकारमध्येही भारतीय जनता पक्षाची राहणार नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री आतिशी यांनी केला.

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं?

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक शेकडो जणांना घेऊन पदयात्रा काढत दिल्लीत दाखल होणार होते. दिल्लीतील राजघाटावर ते आंदोलन करण्याची शक्यता होती. सोनम वांगचुक हे त्यांच्या काही मागण्या केंद्र सरकारसमोर मांडणार होते. मात्र, त्याआधीच सोनम वांगचुक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, यावरून आता दिल्लीत राजकारण तापलं आहे.