Delhi CM Atishi’s belongings Forcibly Removed From Home : दिल्लीतील आप सरकारच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आतिशी यांचं सामान त्यांच्या शासकीय निवासस्थानातून बाहेर काढण्यात आलं आहे. दोनच दिवसांपूर्वी त्या या निवासस्थानी राहण्यास आल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचं घर सील केलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास फ्लॅगस्टाफ रोड, सिव्हिल लाईन्स येथील शीश महल या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि चाव्या ताब्यात घेतल्या. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तीन आठवड्यांनी शीश महल रिकामे करण्यात आले. मधल्या काळात आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आतिशी या शासकीय निवासस्थानी स्थलांतरीत होणार होत्या. परंतु, त्यांच्याकडे याबाबतचं अधिकृत पत्र नव्हतं. दिल्लीत मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून कोणतंही ठराविक निवासस्थान नाही. ६, सिव्हिल लाईन्समधील फ्लॅगस्टाफ रोड येथील निवासस्थानी केजरीवाल २०१५ पासून राहत आहेत. २०२०-२१ मध्ये घराची पुनर्बांधणी करण्यात आली होती. या शीश महलसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आल्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे घर रिकामे करायला लावले

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने या कारवाईला अभूतपूर्व म्हटले आहे. “देशाच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांना घर रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. भाजपाच्या सांगण्यावरून नायब राज्यापालांनी मुख्यमंत्री आतिशी यांचे सामान जबरदस्तीने काढून घेतले आहे . भाजपाच्या एका बड्या नेत्याला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान देण्याची नायब राज्यपालांच्या वतीने तयारी सुरू आहे. २७ वर्षांपासून दिल्लीत वनवासात असलेल्या भाजपाला आता मुख्यमंत्र्यांचं निवासस्थानही ताब्यात घ्यायचं आहे”, असं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा >> Video: दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा; मुख्यमंत्री भाजपा आमदारांच्या गाडीत; आपच्या मंत्र्यांचं पायांशी लोटांगण!

दुपारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून एक सायकल-रिक्षा आणि एक मिनी ट्रक कपाट आणि काही पुठ्ठ्याचे बॉक्स घेऊन गेले. प्रवेशद्वाराजवळ बॅगेज स्कॅनर पांढऱ्या कापडाने झाकलेले होते. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की सीएम कॅम्प ऑफिस बंद करण्यात आले आणि कर्मचाऱ्यांना परिसर सोडण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, दक्षता संचालनालयाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या सचिवंना नोटीस पाठवली. PWD कडून निर्देश असूनही घराच्या चाव्या न दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या विशेष सचिवासह तीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये तैनात असलेले हे इतर अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांना सात दिवसांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cm atishis belongings forcibly removed from home was not given an official allotment letter for the premises sgk