मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून दिल्ली भाजपमधील वाद मिटण्याची चिन्हे नाहीत. आपण कोणत्याही पदाच्या स्पर्धेत नाही, असे प्रदेशाध्यक्ष विजय गोयल यांनी जाहीर केले आहे. मात्र उमेदवार जाहीर करण्याबाबत पक्ष नेतृत्वाने तातडीने मार्ग काढावा अशी मागणी करत मतभेदांनी अप्रत्यक्ष कबुलीच दिली.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत गोयल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्यास पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांनी विरोध केल्याचे वृत्त होते. माजी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पुढे आल्याने गोयल नाराज असल्याचे वृत्त आहे. मात्र आपण राजीनामा देण्याची कुठलीही धमकी दिलेली नाही असे गोयल यांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात केंद्रीय नेतृत्व विलंब करत आहे काय असे विचारता, निवडणुकीशी संबंधित सर्व निर्णय तातडीने करावेत असे सांगत, मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीबाबत तातडीने ठरवावे अशी मागणीच त्यांनी एक प्रकारे केली. हर्षवर्धन यांचे नाव पुढे केल्यास आपल्याला ताकदीने काम करणे अवघड असल्याचे गोयल यांनी पक्षाच्या नेतृत्वाला सांगितले.
छत्तीसगढ भाजपमध्येही मोठय़ा प्रमाणावर नाराजी
रायपूर : छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच भाजपमधील नाराजी उफाळून आली आहे. भाजपच्या ६७ जणांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये २० नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर दहा आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमेदवारी नाकारलेल्यांनी चुकीच्या पद्धतीने उमेदवारी वाटप केल्याचा आरोप केला आहे. प्रदेश उपाध्यक्ष सच्चिदानंद उपासने यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून, पक्षाने आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला डावलल्याची टीका त्यांनी केली आहे. पक्षाने उद्योजकांना प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उपासने रायपूर शहर उत्तर मतदारसंघातून इच्छुक होते. गेल्या वेळी ते १४३६ मतांनी पराभूत झाले होते. त्यांच्या ऐवजी या वेळी पक्षाने श्रीचंद सुंदरनी या सिंधी समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. महेंद्रगड येथील आमदार दीपक पटेल यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. गेल्या वेळी १४ हजार मतांनी ते विजयी झाले होते. पक्षाने आपल्याला कशाच्या आधारावर उमेदवारी नाकारली. यामागे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी बंडाचा झेंडा उभारणार असल्याचे संकेत दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष रामसेवक पैकरा यांनी उमेदवारी देताना सर्वेक्षण केल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून यादी जाहीर केल्याचे सांगितले. यामागे कोणतेही षड्यंत्र नसल्याचा दावा त्यांनी केला. ज्यांचा स्थानिक पातळीवर संपर्क आहे अशांना संधी दिल्याचे त्यांनी सांगितले.