Delhi CM Rekha Gupta : दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पदभार स्वीकारून २० दिवस झाले आहेत. या २० दिवसांत त्यांनी दिल्लीकरांना पुढील पाच वर्षांमध्ये कोण-कोणती कामे केली जातील, कोणत्या योजना आणल्या जातील, निवडणुकीआधी दिलेल्या कोणत्या आश्वासनांवर सर्वात आधी काम केलं जाईल याबाबतच्या अनेक घोषणा केल्या आहेत. दरम्यान, मंगळवारी (११ मार्च) त्यांनी शालीमार बाग क्लब सोसायटी येथे होळीच्या पूर्वसंध्येला आयोजित एका कार्यक्रमादरम्यान आणखी एक घोषणा केली. त्या म्हणाल्या, “आपल्या यमुना नदीत लवकरच क्रूज सेवा सुरू केली जाणार आहे. एका छोट्या क्रूजच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. पुढच्या तीन ते चार महिन्यांमध्ये ही क्रूज सेवा सुरू होईल.” यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं, जे ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
रेखा गुप्ता म्हणाल्या, “मी आत्ता गृहमंत्र्यांना भेटणार होते. आमची भेटीची वेळ निश्चित होती. परंतु, इथे येण्यासाठी मी त्या भेटीसाठी जाण्यास नकार दिला. मी गृहमंत्र्यांना कळवलं की आज आम्ही आमच्या भागात कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि मला त्या कार्यक्रमाला जावं लागेल. त्यामुळे मी आजच्या भेटीसाठी येऊ शकणार नाही. मला भेटीसाठी दुसरी वेळ द्या. जरा विचार करा, मी थेट गृहमंत्र्यांना भेटीसाठी नकार देऊन इथे आले आहे. माझ्या हिंमतीला दाद द्या. रेखा गुप्ता यांचं हे वाक्य ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच हशा पिकला होता.”
रेखा गुप्ता यांनी सांगितलं की “गंगेच्या धर्तीवर आपण यमुना नदी साफ करण्यासाठी स्वच्छता अभियान हाती घेतलं आहे. लवकरच आपल्या यमुना नदीचं पाणी देखील स्वच्छ होईल. तसेच येत्या चार पाच महिन्यांत यमुना नदीत एका छोट्या क्रूजच्या फेऱ्या सुरू केल्या जातील.” यासंदर्भातील सामंजस्य करारावर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी स्वाक्षरी केली आहे.
कोण आहेत रेखा गुप्ता?
गेल्या महिन्यात दिल्लीची विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ७० पैकी ४८ तर आम आदमी पार्टीने २२ जागा जिंकल्या आहेत. या विजयासह भाजपाने राज्यात सरकार स्थापन केलं असून रेखा गुप्ता या दिल्ली सरकारच्या प्रमुख आहेत. त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या असून त्यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रिय सदस्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला होता. १९९४-९५ मध्ये त्या दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडून आल्या होत्या. १९९५-९६ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिव झाल्या. पुढे त्यांनी १९९६-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपदही सांभाळलं आहे. २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता शालीमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. मात्र २०२५ च्या निवडणुकीत त्यांनी आम आदमी पार्टीच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला आहे. आधीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये वंदना कुमारी वरचढ ठरल्या होत्या. रेखा गुप्ता या मूळच्या हरियाणातील जिंद येथील आहेत.