Congress Alka Lamba shared a photo with Delhi CM Rekha Gupta : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळाल्यानंतर आता पक्षाने रेखा गुप्ता यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा दिली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या कार्यक्रमात रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबर भाजपाच्या सहा आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यादरम्यान काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी पक्षांतर्गत चालणारे राजकारण बाजूला ठेवत दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत १९९५ मध्ये दोघांनी एकत्र शपथ घेतल्याचा एक खास फोटो देखील शेअर केला आहे.

लांबा यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हा जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (DUSU) अध्यक्षपदाची राष्ट्रीय विद्यार्थी संघाकडून (NSUI) तर रेखा गुप्ता या एबीव्हीपीकडून (ABVP) महासचिव पदाची शपथ घेताना दिसत आहेत.

रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाबद्दल शुभेच्छा देताना लांबा म्हणाल्या की, “१९९५ सालचा हा आठवणीतला फोटो- जेव्हा मी आणि रेखा गुप्ता यांनी एकत्र शपथ घेतली होती – मी एनएसयूआयकडून दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (DUSI) अध्यक्षपदावर निवडून आले होते आणि रेखा यांनी एबीव्हीपीकडून महासचिव पदाची निवडणूक जिंकली होती- रेखा गुप्ता यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.”

“दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि आम्ही दिल्लीकर आशा व्यक्त करतो की आई यमुना स्वच्छ होईल आणि लेकी सुरक्षित,” असेही अलका लांबा त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.

“रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर झालं तेव्हा मला ३० वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. १९९५ सालचा एक फोटो मला सापडला. त्यात मी एनएसयूआयकडून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले होते तर रेखा गुप्तांनी अभाविपच्या सचिवपदाची निवडणूक जिंकली होती. आम्ही तेव्हा २० वर्षांच्या होतो. आम्ही एकत्र मिळून काम केलं. त्यांच्याशी विचारसरणीचा वाद होता, यापुढेही राहील. महत्त्वाच्या मुद्द्यांवर रेखा व माझी सहमती असायची, आम्ही एकत्र मिळून काम केलं आहे. रेखा त्या काळातही फार आक्रमक होती,” असे अलका लांबा एएनआय वृत्तसंस्थाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत विजयानंतर तब्बल २७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपाने दिल्लीत सत्ता मिळवली आहे. दरम्यान रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात रेखा गुप्ता यांच्यासह सहा भाजपा आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दिल्ली कॅबिनेटमधील सहा मंत्री

१. परवेश वर्मा (नवी दिल्ली)

२. मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन)

३. रविंद्र कुमार इंद्रज (बवाना)

४. कपिल मिश्रा (करवाल नगर)

५. आशिष सूद (जनकपुरी) आणि

६. पंकज कुमार सिंग (विकासपुरी)

Story img Loader