Delhi CM Rekha Gupta : भारतातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणि मोकाट जनावरे ही सर्वत्र पाहायला मिळतात. अनेक वेळ रस्त्याच्या मध्येच जनावरे बसल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. लोक या मोकाट जनावरांना रस्त्यावर उभं राहून खायला घालतात याचा परिणाम म्हणून ही जनावरे रस्त्यांच्या जवळपासच फिरू लागतात आणि परिणामी वाहतूक कोंडी होते. असाच काहीसा प्रकार राजधानी दिल्लीतील रस्त्यावर पाहायला मिळाला. मात्र यावेळी रस्त्यावरील गायींना भाकरी खाऊ घालणाऱ्या एका व्यक्तीला खुद्द दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी असं न करण्याबाबत समज दिली. त्यांनी सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
नेमकं काय झालं?
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये त्या कार चालवणाऱ्या व्यक्तीला हात जोडून विनंती करताना दिसत आहेत. आज सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रस्त्यावर गायी आणि त्यांना भाकरी खाऊ घालणाऱ्यांना पाहूण त्यांचा ताफा थांबवला. गायींच्या मध्ये जाऊन त्यांनी एका कार चालकाला हात जोडून विनंती केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आला. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की एका कार चालकाने गायींसाठी रस्त्याच्या मध्येच भाकरी टाकल्या होत्या. यावरून रेखा गुप्ता त्याला असे न करण्याबाबत समजावताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कार चालकाने हात जोडलेले दिसत आहेत.
jरेखा गुप्ता काय म्हणाल्या?
रेखा गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट लिहीत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, आज राजधानीत फिरतेवेळी मी पाहिलं की एक व्यक्तीने कारमधून रस्त्यावर भाकरी टाकली- कदाचित गायींना खाण्यासाठी फेकली असावी, मी गाडी थांबवायला सांगितली आणि त्या व्यक्तीला पुन्हा असे न करण्याची विनंती केली.
भाकर आपल्यासाठी फक्त अन्न नाही, ती आपली संस्कृती, श्रद्धा आणि सन्मानाचे प्रतिक आहे. रस्त्यावर भाकरी फेकल्याने गाय माता आणि इतर प्राणी ती खाण्यासाठी येतात, ज्यामुळे त्यांच्या जीवालाच धोका होत नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या आणि वाहानांच्या सुरक्षेला देखील धोका निर्माण होतो. अन्नाचा अपमान होता कामा नये. जर तुम्हाला प्राण्यांना खाऊ घालायचे असेल तर कृपया हे काम एखाद्या गौशाळेत किंवा ठराविक जागेवर करा. आपली ही संवेदनशीलता, जबाबदारी आणि संस्कार यांचा परिचय देते.
मी सर्व दिल्लीतील नागरिकांना विनंती करते की रस्त्यावर भाकर किंवा कोणतेही अन्न फेकू नका. प्राण्यांना प्रेमाने आणि जबाबदारीने अन्न खाऊ घाला. आपल्या संस्कृतीचा सन्मान करा आणि आपले रस्ते सुरक्षित राहतील याची काळजी घ्या, असेही रेखा गुप्ता त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
आज राजधानी में भ्रमण के दौरान, मैंने देखा कि एक व्यक्ति ने अपनी कार से रोटी सड़क पर फेंकी- संभवतः गाय को खिलाने के उद्देश्य से। मैंने गाड़ी रुकवाई और उस व्यक्ति से आग्रह किया कि कृपया ऐसा दोबारा न करें।
— Rekha Gupta (@gupta_rekha) April 12, 2025
रोटी हमारे लिए केवल भोजन नहीं है, वह हमारी संस्कृति, श्रद्धा और सम्मान का… pic.twitter.com/PS0bYmOBG6
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा (आप) पराभव करून भाजपाने २६ वर्षांहून अधिक काळानंतर दिल्लीत सरकार स्थापन केले आहे. यादरम्यान मुख्यमंत्री पदाची जबाबदारी गुप्ता यांच्याकडे आली आहे. दरम्यान आजच्या या घटनेनंतर गुप्ता यांनी परिसरातील भटक्या गुरांसाठी योग्य निवारा देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. दिल्लीच्या वार्षिक अर्थसंकल्पात ‘मॉडेल गौशाळा’ उभारण्यासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.