Delhi UPSC Student Deaths : दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या घटनेनंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटकही केली होती. दरम्यान, याप्रकरणी आता आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये धडक देऊन तळघराचं गेट तोडणाऱ्या एसयूव्ही गाडी चालकाचासुद्धा समावेश आहे. याप्रकरणात आतापर्यंत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक

द इंडियन एक्सप्रेस पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी सोमवारी आणखी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये कोचिंग सेंटरच्या तळघराचं गेट तोडणाऱ्या एसयूव्ही चालकाचासुद्धा समावेश आहे. या एसयूव्ही कारने पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाताना तळघराच्या गेटला धडक दिली होती. त्यामुळे हे गेट तुटले आणि पाणी आत शिरलं, असा दावा केला जातो आहे.

हेही वाचा – Jagdeep Dhankhar : “ते गॅस चेंबरपेक्षा…”, दिल्लीतील IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर उपराष्ट्रपतींचा संताप; म्हणाले, “शिकवणी वर्गांचा धंदा…”

अटक झालेल्यांमध्ये गाडी चालकाचाही समावेश

दिल्ली पोलीस उपायुक्त हर्षवर्धन यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्ही सोमवारी तळघराच्या गेटला धडक देणाऱ्या फोर्स गुरखा या गाडीच्या चालकाला अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गाडीने गेटला धडक दिलेल्या तळघरात पाणी साचले होते, असे ते म्हणाले. मात्र, त्यांनी गाडी चालकाचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.

तत्पूर्वी कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक

दरम्यान, याप्रकरणी रविवारी कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली होती. तसेच या तळघरात परवानगीशिवाय लायब्ररी स्थापन करण्यात आल्याचंदेखील पुढे आलं होतं. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, परवानगी नसतानाही या इमारतीच्या तळघरात लायब्ररी सुरु करण्यात आली होती. या ठिकाणी वर्गदेखील घेतले जात होते. महत्त्वाचे म्हणजे या तळघराची परवानगी गोडाऊन म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन करत यासाठिकाणी बेकायदा लायब्ररी सुरु करण्यात आली होती.

हेही वाचा – Delhi Coaching Incident: दिल्लीत IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर एमसीडीची मोठी कारवाई, तळघरांतील १३ कोचिंग सेंटर्स सील

या घटनेनंतर रविवारी कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली. तसेच कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १०६ (१), १५२, २९० आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi coaching centre deaths five more people arrested including suv driver who broke basement gate spb