दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांचा गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने विनयभंग केला. आरोपीने मालीवाल यांना १० ते १५ मीटरपर्यंत गाडीसह खेचत नेलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित सर्व प्रकार बनावट असल्याचा आरोप काहीजणांनी केला आहे.
यानंतर स्वाती मालीवाल यांनी सर्व आरोपांना “गलिच्छ आणि खोटे” असल्याचं म्हटलं. अन्यायाविरोधात आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचंही त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “ज्यांना वाटतं की, माझ्याबद्दल गलिच्छ गोष्टी पसरवून ते मला घाबरवतील. त्यांना मी सांगू इच्छिते की, मी माझा जीव मुठीत घेऊन छोट्याशा आयुष्यात अनेक मोठी कामं केली आहेत. माझ्यावर अनेक हल्ले झाले पण मी थांबले नाही. प्रत्येक अत्याचारानंतर माझ्यातील आगीची धग आणखी वाढत गेली. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही. मी जिवंत असेपर्यंत लढत राहीन”
भारतीय जनता पार्टीने स्वाती मालीवाल यांच्या स्टिंग ऑपरेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही संपूर्ण घटना दिल्ली पोलिसांना बदनाम करण्याचा कट होता, असं भाजपाने म्हटलं. तर दिल्लीतील भाजपा नेते वीरेंद्र सचदेवा यांनी दावा केला की, आरोपी कारचालक हा दक्षिण दिल्लीच्या संगम विहारमधील रहिवासी असून तो आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आहे. या प्रकरणी ४७ वर्षीय कार चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश चंद्र असं कार चालकाचं नाव आहे. तो मालीवाल यांना कारमध्ये बसण्यास सांगत होता. यावेळी जाब विचारायला गेलेल्या मालीवाल यांनी कारच्या खिडकीत हात ठेवला. दरम्यान आरोपीनं कारच्या खिडकीची काच वर घेतली आणि वेगाने कार पळवली. यावेळी मालीवाल यांचा हात कारच्या खिडकीत अडकला होता. त्यामुळे त्या १० ते १५ मीटरपर्यंत कारसह खेचल्या गेल्या.