दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. दिल्लीतील सातपैकी चार जागा ‘आप’ लढवत असून तीन ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढवत आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी दिल्ली काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पक्षाचे अध्यक्ष अरविंद सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे सरचिटणीस दीपक बाबरिया यांनी माझ्या कामात हस्तक्षेप केला, असा आरोप ठेवून लवली यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना लिहिलेल्या पत्रात लवली यांनी म्हटले की, पक्षात मी अपंग झालो असल्याचे मला वाटत आहे. दिल्ली काँग्रेस चालविण्यात मला असमर्थतता वाटत आहे. बाबरिया हेच दिल्ली काँग्रेस चालवत आहेत, अशी अनेकांची भावना झाली आहे. एवढेच नाही तर जे लोक बाबरिया यांच्या विरोधात जातात, त्यांना पक्षातून काढून टाकण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जातो.

तसेच काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षाशी आघाडी केल्यामुळे संपूर्ण दिल्ली काँग्रेस या निर्णयाच्या विरोधात आहे. “काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून स्थापन झालेल्या पक्षाशी आघाडी करण्याच्या निर्णयाविरोधात संपूर्ण दिल्ली काँग्रेस पक्ष उभा होता. आज त्याच पक्षाचे अर्धे मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. त्यांच्याशी आघाडी कशासाठी? हा आमचा प्रश्न होता.

अरविंदर सिंग लवली म्हणाले की, आमच्या मनाविरोधात जाऊन पक्षश्रेष्ठींनी ‘आप’शी आघाडी केल्यानंतर तोही निर्णय आम्ही स्वीकारला. पण जागावाटपात तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर उत्तर पश्चिम आणि ईशान्य दिल्लीत दोन बाहेरच्या नेत्यांना उमेदवारी दिली गेली. हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता. काँग्रेसने उदित राज यांना ईशान्य दिल्लीतून तर जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कैन्हया कुमारला उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

अरविंदर सिंग लवली पुढे म्हणाले की, उदित राज आणि कन्हैया कुमार यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर दिल्लीतील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. या निर्णयाचा कार्यकर्त्यांनी विरोधही केला. आम्ही नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती निवळण्यापेक्षा सरचिटणीस दीपक बाबरिया यांनी असंतुष्य पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यास सांगितले. यावरून त्यांच्याशी अनेकदा जोरदार वादही झाले.

दुसरीकडे उदित राज यांनी केलेल्या अपमानास्पद टिप्पणीकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच कन्हैया कुमार यांनी माध्यमांशी बोलताना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे थोडे जास्तच कौतुक केल्याचाही मुद्दा लवली यांनी उपस्थित केला. दोन्ही उमेदवारांची ही कृती पक्षविरोधी आहे. अशा अनेक कारणांमुळे मी पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे मी या पदाचा राजीनामा देत आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi congress chief arvinder lovely resigns cites interference by leader kvg