आम आदमी पक्षात प्रवेश केल्यानंतर काही तासातच काँग्रेस नेत्याने पुन्हा एकदा घरवापसी केली आहे. दिल्ली काँग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहदी यांनी आपण पुन्हा पक्षात परतल्याचं जाहीर केलं आहे. अली मेहदी यांनी मध्यरात्री व्हिडीओ जारी करत आपण फार मोठी चूक केल्याचं सांगत माफी मागितली. ट्विटरला शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी आपण राहुल गांधींचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं आहे.
मेहदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यासोबत आपमध्ये प्रवेश केलेल्या नवनियुक्त नगरसेविका साबीला बेगम आणि नाजिया खातून यादेखील काँग्रेसमध्ये परतल्या आहेत.
व्हिडीओमध्ये अली मेहदी हात जोडून माफी मागत असल्याचं दिसत आहे. “मी फार मोठी चूक केली,” असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. यावेळी ते वारंवार माफी मागत होते. तसंच “माझे वडील ४० वर्ष काँग्रेसमध्ये होते,” अशीही आठवण करुन दिली. आपण इतर नगरसेवकांनाही व्हिडीओ शेअर करण्यास सांगितलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
“नगरसेविका नाजिया खातून, सबिला बेगम आणि आमचे ब्लॉक अध्यक्ष अलीन अन्सारी हे सर्वजण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे कार्यकर्ते आहोत आणि राहू. राहुल गांधींचा विजय असो,” असं ट्वीटही त्यांनी केलं आहे.
मेहदी यांनी आपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. युथ काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख मनू जैन यांनी मेहदी यांचा उल्लेख साप असा केला होता. तसंच किती पैसे मिळाले असल्याची विचारणाही केली होती.