दिल्ली दंगलीशी संबंधित खटल्यांमध्ये आरोपी असलेल्या शरजील इमामवर देशद्रोह, यूएपीएसह इतर अनेक कलमे लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधी निदर्शनादरम्यान शरजीलने केलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे त्याच्यावर ही कलमे लावली जातील. शरजीलने उत्तर प्रदेशमधील अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्लीतील जामिया परिसरात ही भाषणे दिली होती.
ईशान्य दिल्ली दंगलीच्या संदर्भात यूएपीए प्रकरणासह शरजील इमामवर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. १६ जानेवारी २०२० रोजी त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठात दिलेल्या भाषणासाठी, आसाम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, नवी दिल्ली, मणिपूर या पाच राज्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती.
शरजील इमामची वक्तव्यं कन्हैय्या कुमारपेक्षा घातक-अमित शाह
शरजील इमामने देशाबाबत केलेली वक्तव्यं कन्हैय्या कुमारने देशाबाबत केलेल्या वक्तव्यांपेक्षा घातक आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. शरजील इमामला पोलिसांनी अटक केल्यानंतर बोलताना अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याने देशाविरोधात केलेली वक्तव्यं अत्यंत घातक आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. आसाम भारतापासून स्वतंत्र करा असं वक्तव्य करुन शरजील इमामने देश तोडण्याचीच भाषा केली होती. २०१६ मध्ये कन्हैय्या कुमारने भारतीय लष्कराबाबत काही वादग्रस्त वक्तव्यं केली होती. ज्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. मात्र शरजील इमामने केलेली वक्तव्यं त्या वक्तव्यांपेक्षाही घातक आहेत असं अमित शाह यांनी म्हटलं होतं.