दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने ईडीचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मनीष सिसोदिया यांना ७ दिवसांसाठी सक्तवसुली संचालनालयाच्या रिमांडमध्ये पाठवलं आहे. ईडीने कोर्टाकडे १० दिवसांसाठी सिसोदिया यांच्या कोठडीची मागणी केली होती. या कोठडीला सिसोदिया यांचे विधीज्ञ दयान कृष्णन यांनी विरोध केला होता. अता सिसोदिया १७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहतील. दरम्यान, सीबीआय प्रकरणी सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती जी झाली नाही. यावर आता २१ मार्च रोजी सुनावणी होईल.
या प्रकरणी ईडीचे वकील जोहेब हुसैन यांनी एका षड्यंत्राचा दावा केला आहे. ते कोर्टात म्हणाले की, “सिसोदिया यांनी त्यांचा फोन नष्ट केला आहे. परंतु तपासात पुराव्याचे काही धागेदोरे सापडले आहेत.” ईडीचा आरोप आहे की, “सिसोदिया यांनी घोटाळ्याबाबत चुकीची माहिती दिली आहे.” ईडीने म्हटलं आहे की, “बीआरएसच्या आमदार के. कविता आणि सिसोदिया यांच्यात राजकीय अंडरस्टँडिंग होतं.”
कोर्टात सुनावणीदरम्यान ईडीने म्हटलं आहे की, “मद्य धोरणाद्वारे मोठमोठ्या लोकांना फायदा झाला आहे. हा फायदा मिळवून देण्यात आला आहे. या धोरणाद्वारे दक्षिण भारतातल्या कंपन्यांना देखील फायदा मिळवून दिला आहे. ईडीने दावा केला आहे की, मनीष सिसोदिया यांनी इतर काही लोकांच्या नावाने फोन आणि सिम कार्ड खरेदी केले होते.”
हे ही वाचा >> ‘या’ मारुती कारसमोर Tata Nexon ठरली फिकी, १३ महिन्यांपासूनचं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ६१,५०० ग्राहक रांगेत
नवीन मद्य धोरण घाऊक विक्रेत्यांच्या नफ्यासाठी?
सुनावणीदरम्यान, ईडीने कोर्टाला सांगितलं की, “नवीन मद्य धोरण बनवण्यामागे सिसोदियांचा वेगळा कट होता.” संचालनालयाने कोर्टाला सांगितलं की, “विजय नायर यांच्यासह इतरांनी हा कट रचला होता. नवीन मद्य धोरण घाऊक विक्रेत्यांच्या नफ्यासाठी आणलं गेलं आहे.”