Delhi Liquor Scam Case : दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, केजरीवाल यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारभाराविरोधात दाखल केलेल्या एका याचिकेवर दिल्लीतल्या सत्र न्यायालयात आज (१४ जून) सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला फटकारलं. न्यायालयाने म्हटलं आहे की “ईडी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या वैद्यकीय तपासण्यांशी संबंधित विनंत्यांवर आक्षेप घेऊ शकत नाही.” न्यायमूर्ती मुकेश कुमार यांनी केंद्रीय तपास यंत्रणेला सांगितलं की “आरोपी केजरीवाल हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ते ईडीच्या कोठडीत नाहीत. त्यांना एखादा वैद्यकीय दिलासा हवा असेल तर त्याच्याशी तुमचा काहीच संबंध नाही.”
केजरीवाल यांनी तिहार तुरुंग प्रशासनाला विनंती केली होती की त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल तेव्हा त्यांची पत्नी व्हडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडलेली असायला हवी. त्यानुसार न्यायालयाने आता तुरुंग अधीक्षकांना केजरीवालांच्या विनंतीवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाच्या सुनावणीवेळी ईडीची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर असलेले विशेष सरकारी वकील जोहेब हुसैन यांनी न्यायालयाला विनंती केली की त्यांनी केजरीवाल यांच्या पत्नीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केजरीवाल यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी उपलब्ध करण्याबाबत तुरुंग अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवायला हवा. यावर न्यायमूर्ती म्हणाले, “आम्ही तुरुंग प्रशासनाकडून यासंबंधीचा अहवाल जरूर मागवू, परंतु याच्याशी तुमचा काहीच संबंध नाही.”
हे ही वाचा >> Israel Hezbollah War : इस्रायल पुन्हा अडचणीत, हमासपाठोपाठ हिजबुल्लाहने २५० हून अधिक क्षेपणास्रे डागली, सैन्यतळांवर ड्रोनहल्ले
दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांनी त्यांच्या जामीनासाठी देखील याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या १९ जून रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, दिल्लीतील एका न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. केजरीवालांची अंतरिम जामीन मागणारी याचिका फेटाळत न्यायालयाने म्हटलं आहे की “केजरीवाल यांनी निवडणुकीच्या काळात जोरदार प्रचार केला होता. तेव्हा ते गंभीर आजारी आहेत असं जाणवलं नाही. मागील वेळेस जामीन मिळाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार करताना ते गंभीर आजारी असल्याचं निदर्शनास आलं नाही.” आजारपण आणि उच्च मधुमेहाचं कारण सांगत अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामीन याचिका दाखल केली होती. तुरुंगात रवानगी झाल्यापासून केजरीवाल यांचं वजन झपाट्याने कमी झाल्याचा दावाही आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केला होता.