Delhi Crime : देशातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरोडा, खून, हिंसा, गोळीबार, जाळपोळ, हाणामारी, लैंगिक अत्याचार, हल्ला, चोरी, अशा अनेक घटना दररोज समोर येतात. आता अशाच प्रकारची एक घटना दिल्लीत घडली आहे. एका स्कूटरवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तासात ५ जणांवर चाकू हल्ला करत त्यातील तीन जणांना लुटल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे.
दिल्लीच्या आदर्श नगर परिसरात स्कूटरवरून येणाऱ्या गुन्हेगारांनी पाच जणांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सांगितली जाते. तसेच यातील तीन जणांना हल्लेखोरांनी लुटलं. गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून आता पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
मुकेश नावाचा एक व्यक्ती एका पार्कमध्ये त्याच्या पिकअप ट्रकमधून सामान उतरवत होता. गुन्हेगारांनी स्कूटरवरून त्याच्याकडे जाऊन त्याच्यावर चाकूने वार केले आणि १२०० रुपये आणि त्याचा फोन हिसकावून घेतला. मुकेशने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दरोडेखोरांनी त्याच्यावर आणखी चाकूने वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर अभिषेक पांडे नावाच्या एका टॅक्सी चालकाने हा सर्व प्रकार पाहिला आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हेगारांनी त्याच्यावरही हल्ला केला आणि चाकूने वार केले.
त्यानंतर पोलीस स्टेशनमधील शिफ्ट संपवून घरी परतणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलवरही हल्लेखोरांनी हल्ला, तसेच चाकूने वार केले आणि नंतर पळून गेले. हा हल्ला एवढ्यावरच थांबला नाही. गुन्हेगारांनी नंतर एका युट्यूबरला लक्ष्य केलं. त्याचा फोन चोरला आणि त्याच्यावरही चाकूने वार केले. दरम्यान, या घटनेतील पीडितांपैकी चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यांच्या घटनेबाबत पोलिसांनी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सध्या तरी या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.