Crime News : महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिला आणि तिच्या मुलासह कुटुंबातील इतर चार जणांची हत्या केल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी एका व्यक्तीला अटक केली आहे. पूर्व दिल्लीतील भजनपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली होती, यानंतर या प्रकरणातील एक आरोपी पॅरोलवरून सुटल्यानंतर गायब झाला होता. दरम्यान या आरोपीला तब्बल १४ वर्षांनंतर अटक करण्यात आले असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

आरोपीचे नाव राज कुमार उर्फ राजू असे आहे. तो उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे त्याची पत्नी आणि मुलांबरोबर राहत होता. तसेच त्याला एका विशेष कारवाई अंतर्गत बेड्या ठोकण्यात अल्याचे पोलिसांनी सांगितले.

एक पुरूष, दोन महिला आणि दोन लहान मुलांच्या हत्येच्या प्रकरणातील सहा आरोपींपैकी राजू एक आहे. ६ जुलै १९९६ साली दिल्लीच्या भजनपुरा भागात एका घरात टाकलेल्या दरोड्यादरम्यान या हत्या करण्यात आल्या होत्या. राजेंदर उर्फ ​​राजू, सुनील, जय किशन, कवलजीत उर्फ ​​कवल सिंह आणि राजरानी अशी अन्य चार आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

“आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी उघड केलं की घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवल्याचा अंदाजावरून ते दरोडा टाकण्यासाठी घरात घुसले होते. जेव्हा तेथे राहणाऱ्यांनी त्यांचा प्रतिकार केला तेव्हा आरोपींनी त्या सर्वांना ठार मारले, घरातल्या एका महिलेवर बलात्कार केला, आणि त्यांनी मौल्यवान वस्तू लुटल्या आणि घटना स्थळावरून पळून गेले,” असे गुन्हे विभागाचे पोलिस उपायुक्त आदित्य गौतम यांनी सांगितले.

पोलिसांनी त्यांच्या निवेदनात सांगितले की, सुनावणीदरम्यान करकारदूम कोर्टाने चार आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना २० डिसेंबर २००२ साली २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यापैकी दोन आरोपी सुनील आणि किशन यांचा शिक्षेदम्यान मृत्यू झाला आणि राज कुमार हा आई आजारी असल्याच्या कारणामुळे मिळालेल्या ४० दिवसांच्या पॅरोलदरम्यान पळून गेला.

राज कुमारबद्दल माहिती गोळा करण्यासाठी पोलीस निरीक्षक राकेश कुमार (गुन्हे) यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक अनुज कुमार आणि अमित ग्रेवाल यांचा समावेश असलेली एक टीम तयार करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिस पथकाने हापूरमध्ये अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवले. अखेर गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज कुमार खरोखर मेरठच्या मुल्तान नगर येथे राहत असल्याचे आढळून आले. या गुप्त माहितीच्या आधारावर छापेमारी करत पथकाने त्याला मेरठ येथून यशस्वीरित्या अटक केली, अशी माहिती पोलिसांनी त्यांच्या निवेदनात दिली.

चौकशीदरम्यान राज कुमारने खुलासा केला की तो मूळचा उत्तर प्रदेश येथील हापूरचा रहिवासी आहे आणि तो दिल्लीतील सदर बाजार येथे सतत जात असे, येथे तो १९९० ते १९९६ दरम्यान एका बॅगा बनवण्याच्या कारखान्यात काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९६ मध्ये राज कुमारच्या एका मित्राने त्याला सांगितले की, दिल्लीतील भजनपुरा येथील त्याच्या चुलत भावाने २२ लाख रूपयांना त्याची संपत्ती विकली आहे आणि पैसे घरी ठेवले आहेत. आरोपींनी घर लुटण्याची योजना आखली आणि ते घरी पोहचल्यानंतर त्यांनी तेथील पुरूष सदस्याची हत्या केली, पण त्यांना घरात कुठेही पैसे सापडले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर संतापलेल्या आरोपींनी घरातील एका महिलेवर बलात्कार केला (ही महिला मृत व्यक्तीची सून होती) आणि त्यानंतर दोन मुलांसह संपूर्ण कुटुंबाची निर्घृणपणे हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी त्यांच्या निवेदनात दिली आहे. त्यानंतर आरोपींनी घरातील मौल्यवान वस्तू लुटल्या आणि ते सर्वजण पळून गेले. फरार असताना राज कुमारचे लग्न झाले आणि तो पत्नी आणि चार मुलांसह मेरठमधील मुल्तान नगर येथे भाड्याने राहत होता आणि मजूर म्हणून काम करत होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.