Delhi Crime : दिल्लीमधील गाझीपूर परिसरात सोमवारी एका सुटकेसमध्ये एका तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आणि या प्रकरणातील आरोपीला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती मोर आली. ही घटना लिव्ह-इन रिलेशनशिपमधून घडली असून या प्रकरणातील आरोपी हा मृत तरुणीचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तरुणी लग्नासाठी दबाव आणत असल्याने त्या तरुणाने तिची हत्या केल्याची घटना घडली.
नेमकं घटना काय?
रविवारी (२६ जानेवारी) गाझीपूर परिसरात सोमवारी एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचा तपास सुरु केला. ही घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि या फुटेजच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
पोलिसांना एका सुटकेसमध्ये एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. मात्र, तरुणीची ओळख पटू शकली नाही. यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमची मदत घेत तपास सुरु केला. तेव्हा मृत तरुणीचे वय २० ते ३५ या दरम्यान असावं असं अंदाज पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी चार पथके तपासासाठी रवाना केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरु केला. तेव्हा पोलिसांना एक संशयास्पद कार आढळून आली. तेव्हा पोलिसांनी कारचा नोंदणी क्रमांकावरून शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी गाझियाबादमधील एक २२ वर्षीय अमित तिवारी नावाच्या तरुणाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्या घेतलं. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमितचा एक मित्रही आढळून आला होता. त्यामुळे त्याच्या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पुढील चौकशी सुरु केली.
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा समोर आला. आरोपी अमितने जळालेला मृतदेह हा त्याच्या २२ वर्षीय चुलत बहिणीचा असल्याचं सांगितलं. तसेच तो तिच्याशी तो एका वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता. अमितने तिच्याशी नातं तोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्यात भांडण होत असे. तसेच गेल्या काही दिवसांपासून तरुणी लग्न करण्यासाठी अमितवर तगादा लावत होती. यावरूनच त्यांच्यात सतत भांडण होत होतं. या सततच्या भांडणानंतर २५ जानेवारीच्या रात्री त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. पण यावेळी अमित हा नशेत होता. त्यामुळे त्याने रागाच्या भरात तिची गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर त्याने त्याच्या मित्राला संपर्क केला. तेव्हा त्याच्या मित्राने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली. दोन्ही आरोपींनी त्या तरुणीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि त्याची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. गाझीपूरच्या निर्जनस्थळी मृतदेह टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच पुरावा नष्ट व्हावा, यासाठी सुटकेस मृतदेहासह पेटवली असल्याचं आरोपींनी चौकशी दरम्यान सांगितलं. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलेलं असून अधिक तपास सुरु आहे.