केंद्र सरकाने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीचं पालन न केल्यामुळे ट्विटरला असलेलंय कायदेविषयक संरक्षण हटवण्यात आलं आहे. त्यामुळे ट्विटरला मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकताच भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दर्शवल्याप्रकरणी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता अजून एका प्रकरणात ट्विटरविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ट्विटरवरोधा चाईल्ड पॉर्नोग्राफिक मजकूर ट्विटरवर असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

POCSO अंतर्गत ट्विटरविरोधात गुन्हा दाखल!

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स अर्थात NCPCR ने यासंदर्भात ट्विटरविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत सायबर सेलनं ट्विटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. POCSO आणि आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांच्या शोषणासंदर्भातला मजकूर किंवा लिंक ट्विटरवर असल्याचं हा गुन्हा दाखल करताना नमूद करण्यात आलं आहे. Twitter Inc आणि Twitter India Pvt Ltd या दोन्हींची नावं गुन्हा दाखल करताना नमूद करण्यात आली आहेत अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

 

भारताचा चुकीचा नकाशा ट्विटरकडून मागे

सुनावणी पुढे ढकलली!

दरम्यान, ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्या याचिकेवरील सुनावणी ५ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी मनिष माहेश्वरी यांना चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. याविरोधात मनिष माहेश्वरी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनीच ही याचिका पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

‘ट्विटर इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्याविरुद्ध गुन्हा

 

…अखेर नकाशा काढला!

‘ट्वीट लाईफ’ या शीर्षकाखाली ट्विटरच्या वेबसाईटवरील करिअर विभागात हा नकाशा दिसत होता. नेटिझन्सनी याचा निषेध करत ट्विटरवर कठोर कारवाईची मागणी केली होती. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी लेह हा चीनचा भाग दाखवला होता. यावरून गदारोळ झाल्यानंतर ट्विटरनं हा नकाशा साईटवरून काढला होता.